आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवविवाहितेचे प्राण वाचवले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मी केंद्र सरकारचा कर्मचारी असून 1995 मध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये नोकरीस होतो. त्या वेळी आमचा चार ते पाच मित्रांचा ग्रुप होता. त्यात प्राध्यापक, डॉक्टर आणि आरोग्यसेवेतील कर्मचारी यांचा समावेश होता. या शहरापासून तीन कि.मी. अंतरावर लेंडी नदी वाहत होती. तेथे सकाळी पोहण्यास जाण्याचा आमचा नित्यक्रम असायचा. नदीकाठी व्यायाम आटोपला की आम्ही पोहण्याचाही व्यायाम करत होतो. एकदा डिसेंबर महिन्यातील पहाटेच्या सुमारास नदीकडे पाणंदवजा रस्त्याने जात होतो. तेवढ्यात आम्हाला घाईघाईने ओलांडून एक तरुण वयाची स्त्री पुढे निघून गेली.

आमच्यापैकी काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कोणीतरी म्हटले, शेतावर पाखरे हाकारायला जात असेल, पण एवढ्या पहाटे कशासाठी? नदीवर छोटा पूल होता. तिथे आम्ही व्यायाम करत होतो. काही वेळाने पाण्यात ‘धडाम्’ असा पडल्यासारखा आवाज आला. पुन्हा शंकेने जागा घेतली. एवढ्या पहाटे कोणी उडी मारेल असेल? माझ्या छातीत धस्स झाले. ती तरुणी तर नव्हे... आम्ही आवाजाच्या दिशेने धावलो! ज्या ठिकाणी पडल्याचा आवाज आला, तेथे झाडी होती. त्या किना-या वर निरखून पाहू लागलो. तेथे आम्हाला लेडीज चप्पल दिसली. आम्ही काय समजायचे ते समजून चुकलो. उडी मारल्यानंतर ती तरुणी तळाला गेली होती. ती वर आली.

आम्ही मित्रांनी पटापट उड्या मारल्या. आम्ही तिला वाचवण्यासाठी जवळ येताना पाहून तिने एकच धोशा लावला, मला जगायचे नाही, मला वाचवू नका, मरू द्या, परंतु तिचे काहीही न ऐकता तिला किना-यावर आणले. त्यानंतर आम्ही त्या तरुणीला शहर पोलिस ठाण्यात नेले. तिने नव-याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची कबुली दिली. पोलिसांसमोरही तिने मला जगण्याची इच्छा नसल्याचे सांगितले, पण आम्हाला मात्र तिचे प्राण वाचवल्याचे समाधान होते.