Home | Mukt Vyaspith | new project in aurangabad

विदेशी गुंतवणुकीचे स्वागत

रमाकांत गुरव | Update - Jul 20, 2011, 01:12 PM IST

जपानच्या सहकार्याने औरंगाबादमध्ये विकसित होणार्‍या नियोजित स्मार्ट सिटीमध्ये 40 हून अधिक जपानी कंपन्या दाखल होणार असल्याची ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी दिलासा देणारी आहे.

  • new project in aurangabad

    जपानच्या सहकार्याने औरंगाबादमध्ये विकसित होणार्‍या नियोजित स्मार्ट सिटीमध्ये 40 हून अधिक जपानी कंपन्या दाखल होणार असल्याची ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी दिलासा देणारी आहे. जपानमधील एकूण 100 कंपन्या राज्यात उत्पादन सुरू करणार असून त्यातील बहुतांश कंपन्या स्मार्ट सिटीत असतील ही माहिती विदेशी गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर अद्यापही तेवढाच दृढ विश्वास कायम आहे हे दर्शवते. अमेरिकेमध्ये आलेल्या मंदीचा परिणाम भारतावरही काही प्रमाणात झाला. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची प्रगती समाधानकारकरीत्या होत नसल्याने या राज्यात येण्यास विदेशी गुंतवणूकदार फारसे उत्सुक नाहीत, असे म्हटले जात होते. त्यातच मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला, नुकतेच झालेले बॉम्बस्फोट यासारख्या घटनांनी महाराष्ट्रात फारसे सुरक्षित वातावरण नाही असाही एक प्रचार करण्यात येत होता. या प्रचाराला शेजारी राज्यांकडून खतपाणी घातले जात होते. विदेशी-देशी गुंतवणूकदारांनी आपल्याच राज्यात यावे यासाठी तेथील मुख्यमंत्री पायघड्या घालून त्यांचे स्वागत करण्यास तयार होते. त्यातून गुंतवणूकदारांना अधिकाधिक सवलतींची प्रलोभने देण्याचा प्रकारही शेजारी राज्यांकडून होत होता. निकोप स्पर्धेचा हा जमाना असला तरी प्रत्येक वेळी ती तशीच होईल असे नाही. गुजरात राज्याने गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांपासून उद्योग उभारणीपर्यंतच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीला अनुल्लेखाने मारण्याचे कारण नाही. मात्र महाराष्ट्रातील उद्योग आपल्याकडे कसे वळवता येतील यासाठी तेथील मुख्यमंत्र्यांचा जो आटापिटा सुरू असतो तो नक्कीच योग्य नाही. महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे सर्व प्रमुख उद्योगांची कार्यालये आहेत. अनेक महत्त्वाचे उद्योगही राज्यात आहेत. मात्र गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रात एन्रॉनसहित अनेक प्रकल्पांचा जो घोळ घालण्यात आला, हे प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा झाली, आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊच नये म्हणून अनेकांनी ज्या प्रकारे कंबर कसली आहे ते सारे पाहता या राज्यावरील विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला तर तो साहजिकच मानावा लागेल. मात्र महाराष्ट्रात विदेशी-देशी गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्या बळावरच महाराष्ट्र मोठी आर्थिक भरारी घेऊ शकेल. यासाठी जनतेचे कमीत कमी नुकसान होऊन अधिक चांगले प्रकल्प कसे आणता येतील यासाठी कायद्यांमध्येही योग्य सुधारणा व्हायला हव्यात. तसेच राजकारण्यांनी विदेशी प्रकल्पांबाबत अक्कलशून्य भूमिका न घेता व्यवहारी दृष्टिकोनातून त्यांच्याबद्दल मते व्यक्त करायला हवीत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या आगामी जपान दौर्‍यात महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक तेथून नक्कीच आणतील. त्यातून महाराष्ट्राचा निश्चितच फायदा होणार आहे.

Trending