आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टर्म नवी, टीम जुनीच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी राष्ट्रपती भवनावर पार पडलेला शपथविधी सोहळा प्रतीकात्मक असला तरी अवघ्या साडेचार वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ‘बिमस्टेक’ला बळ मिळण्याच्या दृष्टीने तो नक्कीच उपयुक्त ठरेल. तब्बल साडेसहा हजार दिग्गज निमंत्रितांच्या हजेरीत नरेंद्र मोदींनी अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, अरविंद सावंत आदी नव्या मंत्रिमंडळातील २५ सहकाऱ्यांसह शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळामध्ये फारसे आश्चर्यकारक असे काही नाही. अरुण जेटली, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू असे दिग्गज नेते मंत्रिमंडळात नाहीत. महाराष्ट्रातील प्रभूंप्रमाणेच सुभाष भामरे, हंसराज अहिर हेही चेहरे यापुढे मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. नव्या चेहऱ्यांमध्ये लक्षणीय असे फारसे काही नाही. अमित शहा मंत्री होणे हीच शपथविधी सोहळ्याची खरी बातमी. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने संघटनात्मक प्रशासन आणि व्यवस्थापनावर अमीट छाप पाडणारे अमित शहा केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावणार असले तरी पक्षाध्यक्ष ही त्यांची ख्याती आणि खासियत ठरली होती. विविध राज्यांतील विधानसभांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांच्याकडे भाजपाध्यक्ष पदाची धुरा असणे अपेक्षित होते. जे.पी. नड्डा यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. मात्र, नवा अध्यक्ष शहा यांच्याप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्षपदाला न्याय देऊ शकेल का, हा खरा प्रश्न आहे. सुषमा स्वराज यांच्या जागी सुब्रमण्यम् जयशंकर परराष्ट्र मंत्री होणे अपेक्षित आहे. 


महाराष्ट्रातून संजय धोत्रे यांची वर्णी लागली आहे. तशी ही निवड अनपेक्षित आहे. २०१४ मध्ये रावसाहेब दानवे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणे त्यांनी पसंत केले. आता नव्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे जाणार याविषयी कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. शिवसेनेला या वेळीही एकाच मंत्रिपदावर समाधान मानावे लागले आहे. मिलिंद देवरांना पराभूत करणाऱ्या अरविंद सावंतांची निवड अपेक्षितच होती. अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव आढळराव पाटील असे चार दिग्गज नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने शिवसेनेकडे फार पर्यायही नव्हते. शपथविधीच्या आनंदोत्सवाला उधाण आलेले असताना त्याच वेळी मंत्रिमंडळात जद(यु)ला अपेक्षित वाटा नाकारल्यामुळे ‘रालोआ’तील मतभेदही यानिमित्ताने पाहायला मिळाले. तथापि, प्रचंड पाॅलिटिकल कॅपिटल ही ‘मोदी-२’ची जमेची बाजू असून, त्यातही शिवसेना हा मोठा घटक पक्ष ठरला. नव्या सरकारने स्वप्ने बरीच दाखवली आहेत, पण आव्हाने त्याहून मोठी आहेत. ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर ‘डिव्हायडर इन चीफ’ ठरलेले नरेंद्र मोदी नव्या टर्ममध्ये जोडणारे विकासपुरुष ठरावेत, याच शुभेच्छा सर्वसामान्य भारतीयांच्या असणार आहेत.