नवीन नियम / टीव्हीच्या नव्या नियमांनी दरमहा ८० रुपयांची बचत, नव्या दराची १ मार्चपासून होईल अंमलबजावणी

ट्रायने भास्करला सांगितले- ज्या घरात दाेन डीटीएच कनेक्शन त्यांचे दरमहा वाचतील ९८ रुपये
 

दिव्य मराठी

Jan 12,2020 11:39:00 AM IST

विनोद यादव

मुंबई - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अलीकडेच केबल टीव्ही व डायरेक्ट टू हाेमसाठी (डीटीएच) नवीन नियम केले आहेत. देशात जवळपास २० काेटी घरात टीव्ही असून त्यांना याचा फायदा मिळेल. ट्रायचे सचिव एस. के. गुप्ता म्हणाले, ट्रायने गेल्या फेब्रुवारीत न्यू टॅरिफ आॅर्डर (एनटीओ) प्रसिद्ध केला हाेता. त्या वेळी ग्राहक १३० रुपये एनसीएफ भरून १०० वाहिन्या बघायचे. त्यावेळी वितरण प्लॅटफाॅर्म माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार बहुतांश ग्राहक जवळपास २०० वाहिन्या सब्सक्राइब करत हाेते. अशा प्रकारे या २०० वाहिन्यांपेकी १०० वाहिन्या बघण्यासाठी ग्राहकाला १३० रुपये द्यावे लागत हाेते. उरलेल्या १०० वाहिन्यांसाठी २५ वाहिन्यांच्या स्लॅबमध्ये २०-२० रुपये करून ८० रुपये नेटवर्क क्षमता शुल्काच्या रूपाने भरावे लागत हाेते. आता ते करावे लागणार नाही. प्रेक्षक १३० रुपयांतच २०० वाहिन्या बघू शकतील. परंतु इंडियन ब्राॅडकास्टिंग फाउंडेशनचे (आयबीएफ) अध्यक्ष आणि साेनी पिक्चर्स नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ एन. पी. सिंह म्हणाले, ग्राहकांना किती फायदा हाेईल हे सांगता येत नाही. आलाकार्ट प्रायसिंग, बुकेचा डिस्काउंट, किती संख्येने बुके द्यायचे आदींनी आम्ही बांधले आहोत.

X
COMMENT