आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ष नवीन आणि माणसे जुनीच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्पा कांबळे

उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर डायनासोर प्रजाती नष्ट झाली. आज डायनासोरची पृथ्वीवर सत्ता नाही, पण दीड किलो वजनाचा मेंदू असलेल्या माणसाची सत्ता आहे. होमो सेपियन्स सेपियन्सची ही आपली प्रजाती येणाऱ्या काळात टिकेल की नष्ट होईल आणि जर नष्ट झाली तर त्याची कारणे काय असतील?

नवीन वर्ष प्रत्येक वर्षी न चुकता येते किंबहुना त्या बिचाऱ्याला यावेच लागते. हॅपी न्यू इयर म्हणून रात्रीच्या बाराच्या ठोक्याला आपण त्याचे स्वागत करतो. घरात, गच्चीवर, अंगणात, हॉटेलात मित्रमंडळी- कुटुंबे भेटतात. जमेल तेवढी पार्टी करतात. या पार्टीचे धिंगाणा फोटो दुसऱ्या दिवशी फेसबुक, ट्विटरवर टाकले जातात. एक जानेवारीला हँगओव्हर संपलेले लोक हळूहळू परत काम करू लागतात. जुने कॅलेंडर अडगळीत टाकून नवीन कॅलंेडर भिंतीवर लावले जाते. नव्या कॅलंेडरची पाने उत्साहात फडफडत असतात. पण घाई नसावी, प्रत्येकाचा क्रम लागणार असतो. एका महिन्यांनतर त्याच्या पुढचा एक महिना येणार असतो....बारा महिन्यांनी परत हे वर्षही संपणार असते. अनंत काळ, अनंत वेळ असेच चालणार असते. काळाच्या या न थांबत्या चाकावर आपण समाज म्हणून घडत-बिघडत असतो  की तसेच राहणार असतो? आपल्यातला हा बदल पुढे जाणार असतो की मागे  जाणारा असतो? माणसे प्रत्येक वर्षागणिक नवीन होतात की तशीच जुनाट राहतात?

माणसांच्या आधी या पृथ्वीवर एक वेळ महाकाय डायनासोरची प्रजाती राहत होती. उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर ती प्रजाती नष्ट झाली. या प्रजातीच्या नष्ट होण्याची अनेक कारणे सांगितली जातात. जसे -उल्कापात, पृथ्वीचे बदललेले तापमान, दुष्काळ किंवा मांसाहारी डायनासोरची अवाढव्य भूक. तर या ज्ञात-अज्ञात कारणामुळे ही प्रजाती नष्ट झाली. आज डायनासोरची पृथ्वीवर सत्ता नाही, पण दीड किलो वजनाचा मेंदू असलेल्या माणसाची सत्ता आहे.होमो सेपियन्सची ही आपली प्रजाती येणाऱ्या काळात टिकेल की नष्ट होईल आणि जर नष्ट झाली तर त्याची कारणे काय असतील?

भविष्यातील या कारणांचा वेध घेणारी ‘कार्बन’  नावाची एक हिंदी शॉर्ट फिल्म यूट्यूबवर उपलब्ध आहे. रँडम नावाच्या या चित्रपटातील नायकाला हृदय आहे, पण ते कृत्रिम हृदय आहे. स्वच्छ ऑक्सिजनचे स्मगलिंग करणाऱ्या रँडमला पृथ्वी सोडून मंगळावर राहायला जायचेय. प्राणवायू ही क्रयवस्तू झालेली आहे. त्याला भेटणारी परी नावाची मुलगी वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवलीय, पण खरंतर ती एक रोबोट आहे. २०६७ मध्ये कशा प्रकारचे जग असेल हे दाखवणारी ही शॉर्टफिल्म उद्याचे एक भयावह चित्र आपल्यासमोर रेखाटते. हे चित्र खरे असेल की खोटे? दुर्दैवाने हे चित्र खरे असण्याची शक्यता जास्त आहे. मनुष्यप्राण्याने पर्यावरणाची अपरिमित हानी केलेली आहे. विकसित देशांनी वसाहतीकरणातून आशिया व आफ्रिका खंडातील देशांची इकोव्यवस्था नष्ट करण्याचे काम १८ व्या शतकातच सुरू केले. जसजशी वैज्ञानिक प्रगती वाढत गेली तसतशी निसर्गाला नष्ट करण्याची आपली त्सुुनामी शक्तीही वाढत गेली. चीनमध्ये कोळशाच्या खाणीतून होणारे हवेतील प्रदूषण आणि तोडांवर मास्क घालून फिरणारी बीजिंगमधील माणसे आता केजरीवाल यांच्या दिल्लीतही दिसत आहेत. अॅमेझॉन आणि ऑस्ट्रेलियाच्या अवरित जळणाऱ्या जंगलाची आग थेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे. या वेळचा सांताक्लॉज मुंबईत पाऊसही घेऊन आला होता. लहरी मोसमी शेतीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आक्रोश चढत्या बाजारभावाने महानगरातही पोहोचला आहे. वातावरणातील हे भयावह बदलच सांगत आहेत की, आपण नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. तर खरोखरच येत्या काही वर्षांत,दशकात, शतकात मानवी प्रजाती अक्राळविक्राळ डायनासोरसारखी नष्ट होईल का? मला वाटते या प्रश्नाचे उत्तर आपल्या हातात आहे. पर्यावरणाची झालेली झीज दुप्पट वेगाने भरून काढली पाहिजे. झाडे, त्यातील सूक्ष्म कीटक,चिमुकले पक्षी,शाकाहारी-मांसाहारी प्राणी,काळी लाल रेताड अल्कधर्मी आम्लधर्मी जमीन वाचली पाहिजे. खाऱ्या प्राण्यातील प्रवाळ सुरक्षित राहिले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचे वैज्ञानिक उपाय घराघरात पोहोचले पाहिजेत. प्लॅस्टिकबंदी करून परत बाजारात प्लॅस्टिक येतच कसे याचा जाब विचारणारे नागरिक तयार व्हायला हवे. खरेदीची वासनाकंद्रे –मॉलमध्ये जाताना अपराधीभाव वाटला पाहिजे. गरजा कमीत कमी करून नैसर्गिक स्रोतांचे जतन करायला हवे.


नैसर्गिक पर्यावरणाचे सर्व उपायांनी रक्षण करून आपली होमो सेपियन्स प्रजाती लुप्त  होण्यापासून आपण वाचवू शकतो
का?


खेदाने म्हणावे असे म्हणावे लागते की, जोपर्यंत पृथ्वीवरचे सामाजिक पर्यावरण संतुलित होत नाहीत तोपर्यंत आपल्या प्रजातीसमोरचा धोका संपलेला नाही. कारण ग्लोबलायझेशनच्या जमान्यात नुसत्या ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा एकमेकांना बसत नसतो तर आता दहशतवाद, देशप्रेम, व्यसने, बेरोजगारी, गुन्हेगारी यांचेही ग्लोबलायझेशन झाले आहे. अणुबॉम्ब खिशात बाळगणारी आपली प्रजाती पृथ्वीच्या संहाराची अमर्याद शक्ती दिमाखात मिरवत आहे. आतापर्यंत मनुष्याने इतिहासात केवळ दोनदाच अणुबॉम्ब वापरला म्हणजे मानवजात शहाणी झाली असे समजण्याचे कारण नाही. कारण काळ पुढे सरकत असतो. आजचा वर्तमान उद्याचा इतिहास होणार असतो. वर्तमानातील अनेक देशांपाशी हिरोशिमा-नागासाकी करण्याची विध्वसंकारी ताकद आहे. हे शक्तिमान सत्ताधारी शक्तिहीन माणसांमध्ये द्वेषाची आग लावतात. देशभक्तीच्या नावाखाली अमाषनुतेची तणकटे शिवारे काबीज करू लागली आहेत. सहानभूतीशून्य माणसे आपल्याच ‘नो मेन्स लँड’मध्ये भुतासारखी राहत आहेत. नैसर्गिक पर्यावरणाबरोबर या सामाजिक पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी नेमके काय करायचे हा आपल्यासमोरचा कळीचा प्रश्न आहे.

जुन्या काळातील एक मंगलकारी जातक कथा कदाचित आपल्याला या  अस्तित्वासमोरच्या जटिल प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. तर या कथेत दोन सुवर्णमृग आहेत... निग्रोधराज व राखा नावाचे. या दोघांना त्यांच्या सुवर्णकांतीमुळे राजाचे अभय आहे. त्यांच्या कळपातील इतर हरणांना मात्र हे अभय नाही. हरणाच्या मांसाला चटावलेला राजा रोज क्रमाक्रमाने एका गटातील हरणाला मारून खातो. एके दिवशी राखाच्या कळपातील हरिणीला राजाकडून बोलावणे येते. ती बिचारी गर्भवती असते ती राखाला विनंती करते, मला बाळंतीण होऊ दे, मग मी जाते. राखा कठोर असतो. तो आदेश देतो, नियम म्हणजे नियम,पाळलाच पाहिजे. बिचारी व्याकूळ हरिणी निग्रोधराजकडे जाते. खरं तर तो असतो दुसऱ्या कळपाचा नेता, पण त्याला त्या मादीची दया येते. तो स्वतः राजाकडे जातो...राजा आज मला खा. राजाला आश्रय वाटते. या सुवर्णमृगाला तर मी अभय दिलेय. त्याच्या त्यागावर खुश होऊन राजा त्याला पुन्हा अभय देतो..निग्रोधराज याने खुश होत नाही. मग राजा त्याच्या कळपाला अभय देतो. त्यातूनही सुवर्णमृग खुश होत नाही...राजा मग राज्यातील सगळ्या हरिणांना अभय देतो. निग्रोधराज आणखी मागतो...राजा चतुष्पाद प्राणी, जलचर, पक्षी, द्विपाद या सगळ्यांना सजीवसृष्टीला अभय देतो. आता त्या जातक कथेतील सुवर्णमृगाला समाधान मिळते. राजाने राज्यातील प्रत्येक जीवजंतूला, मनुष्यप्राण्याला अभय दिलेय.अहिंसेला राजधर्म केलाय. तर या कल्पनासृष्टीतील  कथेत कथाकाराने प्राण्याला नायक केलंय. आजच्या सत्यसृष्टीचा नायक मनुष्यप्राणी आहे. आता येणाऱ्या वर्षात आपण माणसांनी ठरवायचेय आपण पृथ्वीला अभय देणार की नाही. चला, नवीन वर्षाची नवीन माणसे बनूयात. सगळ्यासाठी अभयदान मागूयात. 

(वरील लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
संपर्क - ९९६९२३४९६१

बातम्या आणखी आहेत...