Home | International | Other Country | New Zealand firing at mosques in Christchurch

भीषण हत्याकांड : न्यूझीलंडमध्ये मशिदींवर हल्ला 49 ठार, बांगलादेशचा क्रिकेट संघ थोडक्यात बचावला 

वृत्तसंस्था | Update - Mar 16, 2019, 09:52 AM IST

वर्णद्वेषातून स्थलांतरित लोकांचे झालेले सर्वात भीषण हत्याकांड

 • New Zealand firing at mosques in Christchurch

  ख्राइस्टचर्च - न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजासाठी एकत्र आलेल्या स्थलांतरित नागरिकांवर नमाजापूर्वी भीषण हल्ला झाला. कोणत्याही देशातील स्थलांतरितांवर झालेला हा आजवरचा सर्वात भीषण वर्णद्वेषी हल्ला आहे. गौरवर्ण श्रेष्ठतेतून झालेल्या या गोळीबाराचा मुख्य आरोपी ऑस्ट्रेलियातील आहे. त्याने प्रथम अल नूर मशिदीमध्ये घुसून गोळीबार केला. त्यात ४१ लोक मृत्युमुखी पडले, ४० जखमी झाले. त्यानंतर तो साडेसहा किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या मशिदीत गेला आणि तेथे ७ जणांना ठार केले. त्याने २१ मिनिटांत हे भीषण कृत्य केले. मशिदीत घुसण्यापूर्वी त्याने फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू केले. न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त संजीव कोहली यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ६ भारतीय मृत झाल्याची माहिती आहे. मात्र सरकारने अद्याप त्यास दुजोरा दिलेला नाही.


  हल्लेखोर ब्रेंटनने ७४ पानी जाहीरनामा अगोदर दिला, श्वेतवर्णीयांच्या हक्कासाठी हे कृत्य केल्याचे सांगितले
  “हा हल्ला युरोपात स्थायिक होणाऱ्या स्थलांतरित नागरिकांना रोखण्यासाठी केला आहे. मी त्यांच्यात दहशत पसरवून ठार मारून संपवेन.’


  महिलेसह ४ अटकेत, मुख्य आरोपी पाकमध्ये गेला होता
  २८ वर्षीय हल्लेखोर ब्रेंटन टॅरंट ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असून त्याच्यासोबत अन्य एक महिला व त्याच्या दोन हस्तकांनाही अटक करण्यात आली आहे. टॅरंट काही महिन्यांपूर्वी पाकलाही गेला होता.


  ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे ३० हजार नागरिक हल्ल्यानंतर नऊ भारतीय बेपत्ता
  हल्ल्यानंतर ख्राइस्टचर्चमध्ये राहणारे ९ भारतीय बेपत्ता आहेत, असे उच्चायुक्त संजीव कोहली यांनी टि्वट करून सांगितले. वकिलातीत भारतीय कुटुंबीयांचे सतत फोन खणखणत आहेत. स्थानिक माहितीनुसार हल्ल्यावेळी चार भारतीय व पाच मूळ भारतीय वंशाचे नागरिक मशिदींत उपस्थित होते. यामध्ये दोन हैदराबादचे, एक पुण्याचा व एक गुजरातचा आहे. न्यूझीलंड सरकारने त्यांच्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांना मृत मानले गेलेले नाही. ख्राइस्टचर्चमध्ये भारतीय वंशाचे ३० हजार नागरिक वास्तव्यास आहेत.


  प्रत्यक्षदर्शी फरीद अहमद म्हणाले, मी मेल्याचे भासवले म्हणून वाचलो...
  नमाजापूर्वी एक शस्त्रधारी व्यक्ती आली. त्याने दरवाजा बंद करत गोळीबार सुरू केला. लोक पळू लागले. मी पळू शकलो नाही. माझ्या शेजारच्या लोकांना गोळ्या लागल्या. माझ्या कपड्यावर त्यांचे रक्त उडाले. मी आशा सोडली होती. हल्लेखोर एकेकाला टिपत होता. माझे रक्ताने माखलेले शरीर पाहून मी गतप्राण झालो आहे, असे हल्लेखोराला वाटले. नंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. पाहतो तर माझ्या आजूबाजूला २४ वर मृतदेह होते.

Trending