World cup / न्यूझीलंडचे प्रशिक्षक स्टेड म्हणाले- भविष्यात अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना देण्यात यावा संयुक्तपणे विजेतेपदाचा बहुमान

ज्याच्याकडे पाचशेच्या चार नोटा, तो श्रीमंत : अमिताभ

दिव्य मराठी

Jul 17,2019 12:44:00 PM IST

वेलिंग्टन - पुढील वेळी अंतिम लढत बरोबरीत सुटल्यास चषक दोघांना द्यावा, असे न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी म्हटले. विश्वचषक अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्येदेखील बरोबरीत धावा निघाल्या. त्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले.


स्टेडने म्हटले की, जेव्हा नियम बनवण्यात आले, तेव्हा विश्वचषकाची अंतिम लढत अशी होईल, हा विचार केला नसेल. आता यावर निश्चित विचार केला पाहिजे. आपण सात आठवडे खेळलो आणि फायनलमध्ये १०० षटकांचा सामना बरोबरीत राहिला, हे निराशाजनक आहे.


अंपायरने ५० व्या षटकात इंग्लंडच्या फलंदाजाला ५ ऐवजी ६ धावा देण्यावर त्यांनी यावर आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले. अंपायर्सना याबाबत माहिती असते, तेदेखील मनुष्य आहेत. खेळाडूंप्रमाणे त्यांच्यादेखील चुका होतात. नियमाच्या आधारे इंग्लंडला विजेता घोषित केल्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


व्हाटमोर म्हणाले, ट्रॉफी दाेन्ही संघांना संयुक्तपणे दिली जावी
अजून एक सुपर ओव्हर सामन्यात हवी : सचिन

सचिन तेंडुलकरच्या मते विश्वचषकाचा अंतिम सामना बराेबरीत राहिल्यास सुपर आेव्हरचा आधार घेतला जाताे. मात्र, ही सुपर आेव्हरही बराेबरीत राहिली तर दुसऱ्या सुपर आेव्हरचा समावेश करण्यात यायला हवा हाेता. ज्यामुळे दाेन्ही संघांच्या मेहनतीचे चीज हाेईल. कारण फायनलमधील विजेतेपद ठरवण्याच्या बाउंड्री काउंट पद्धतीच्या जागी दुसऱ्या सुपर आेव्हरचा समावेश असावा. ही गाेष्ट फक्त वर्ल्डकप फायनलचीच नव्हे, प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असताे. त्यामुळे याबाबतीत घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाला महत्त्व असते, असेही सचिन म्हणाला.


बाउंड्री काउंटचा नियम माहीत नाही : व्हाटमोर
श्रीलंका संघाला १९९६ च्या विश्वविजेतेपदाचा बहुमान िमळवून देण्यात प्रशिक्षक डेव्ह व्हाॅटमाेर यांचे माेलाचे याेगदान राहिले. त्यांनीही यंदाच्या विश्वचषकातील बाउंड्री काउंटच्या नियमाबाबत आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणतात की, मला हा नियमच माहीत नाही. फायनल टाय झाल्याने यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात यायला हवे हाेते. हाच निर्णय खऱ्या अर्थाने याेग्य ठरला असता. त्या नियमावर टीका हाेत आहे.


ज्याच्याकडे पाचशेच्या चार नोटा, तो श्रीमंत : अमिताभ
सर्वाधिक चौकारांच्या नियमावर इंग्लंड विजेता बनल्यावर अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आयसीसीची फिरकी घेतली. त्यांनी ट्विट केले, आपल्याकडे २ हजार रुपये आहेत, माझ्याकडेदेखील २ हजार रुपये आहेत. मात्र, माझ्याकडे पाचशेच्या चार नोटा आहेत. कोण जास्त श्रीमंत? आयसीसी - ‘ज्यांच्याकडे सर्वाधिक पाचशेच्या नोटा तो श्रीमंत.’ अशा प्रकारच्या टि्वटच्या माध्यमातून त्यांनीही आयसीसीच्या त्या नियमावर टीका केली. त्यांच्या या टि्वटला आतापर्यंत १४ हजार चाहत्यांनी रिटि्वट केले आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्याला लाइकही केले आहे.

X