आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधनासाठी नवविवाहितेचा क्रूर छळ, 50 दिवस ठेवले उपाशी; मध्यरात्री दर्गा धुवून कासवाला मुरमुरे भरवण्यास भाग पाडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक, क्रूर आणि अघोरी अशी घटना घडली. गुप्तधनाच्या लोभापायी सलग 50 दिवस नवविवाहितेचा क्रूरपणे छळ केल्याचे समोर आले आहे. चिमूर तालुक्यातील सावरी-बीडकर गावातील कारेकर कुटुंबातून हा प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेने विकृत झालेल्या सुशिक्षित कुटुंबाने, गुप्तधनासाठी नवविवाहितेला दररोज रात्री अडीच वाजता घरातील दर्गा धुऊन, जिवंत कासवाला मुरमुरे भरवण्यास भाग पाडले होते. सतत 50 दिवस उपासमार, मारझोड आणि अघोरी प्रकारामुळे खचलेल्या नवविवाहितेची अंनिसने कशीबशी सुटका केली.


नेमके काय आहे प्रकरण?

सावरी-बीडकर गावातील समीर गुणवंतचा विवाह ऑगस्ट 2018 मध्ये, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या वाघाडे कुटुंबातील सवितासोबत झाला. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहिता सविताला रात्री अडीच वाजता उठून, घराच्या अंगणात असलेल्या पुरातन दर्ग्याची स्वच्छता आणि दर्गा धुण्यास सांगितले. याच दर्ग्यात असलेल्या जिवंत कासवाला आंघोळ घालून, पूजा अर्चना करत सुमारे दोन तास मुरमुरे खाऊ घालण्यास बजावण्यात आले होते. हे सगळे केल्याने दर्ग्याखाली असलेले गुप्तधन आपोआप वर येईल अशी कारेकर कुटुंबाची अंधश्रद्धा होती. याच दरम्यान समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला आणि त्याने हळद मिटण्याच्या आधीच सविताला बेदम मारहाण-चटके देण्यास सुरुवात केली. यात सासू-सासऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

 

कारेकर यांच्या घराला उंच संरक्षक भिंत असल्याने आत सुरु असलेल्या प्रकाराबाबत शेजाऱ्यांना माहीत झाले नाही. याशिवाय सूर्योदय ते सूर्यास्त या काळात नवविवाहितेला उपाशी ठेवून हे कृत्य करायचे असल्याने, पहिल्या दिवसापासूनच सविताची उपासमार केल्याचा आरोप आहे. छळाचा हा प्रकार सतत सुरु राहिला. या दरम्यान सविताकडील मोबाईल काढून घेतल्यामुळे तिला माहेरी संपर्क साधता आला नाही.  


तिसरे लग्न असल्याचा धक्कादायक प्रकार

या दरम्यान नवरा समीरचे हे तिसरे लग्न असल्याचे सविताला धक्कादायक बाब समजली. या छळाची माहिती सविताच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी कारेकर यांचे घर गाठत मुलीला माहेरी नेले. सविताच्या वडिलांनी पोलीस-वनविभागाला या छळाविषयी माहिती दिली. मात्र यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 

 

दरम्यान समीर चौथा विवाह करणार असल्याची माहिती वाघाडे कुटुंब मिळाली आणि ते कारेकर कुटुंबीयांना धडा शिकविण्यासाठी पुढे सरसावले. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी माहिती दिल्यावर, त्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्यानंतर, याप्रकरणी सासू-सासऱ्यांसह समीरव वर गुन्हा दाखल झाला.