अयाेध्येत मंदिर व्हावे / अयाेध्येत मंदिर व्हावे ही रामाची इच्छा; माेदींनी मंदिर होणार नसल्याचे म्हटलेच नाही : भागवत

Jan 03,2019 08:59:00 AM IST

नागपूर- माझा श्री रामावर पूर्णि विश्वास आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही रामाची इच्छा आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होईलच, अशी नि:संदिग्ध ग्वाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे दिली. सेवासदन शिक्षण संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महा मुलाखतीत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वटहुकूम काढण्याविषयी विचार केला जाईल, असे म्हटले होते. याविषयी विचारले असता मोदींनी राम मंदिर होणार नाही असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त न्यायालयीन प्रक्रियेनंतर विचार करू, असे म्हटले. त्यामुळे मंदिर होईलच, असे सरसंघचालकांनी ठासून सांगितले.

राम मंदिराला वेळ होतोय असे वाटत नाही का, असे विचारले असता, राम मंदिराचा मुद्दा ६९ वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे तसाही वेळ झालेलाच आहे. पण आता अधिक वेळ होणार नाही. कारण वेळ कधीही बदलू शकते, असे सूचक वक्तव्य सरसंघचालकांनी केले. दरम्यान,गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेने देखील राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे. गेल्याच महिन्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयाेध्या वारी केली होती. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबाबत मात्र त्यांनी अधिक बोलणे टाळले.

सरसंघचालक म्हणून माझी भूमिका महत्त्वाची
मंगळवारी माध्यमांशी बोलताना सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राम मंदिरावर संघ ठाम असल्याचे सांगितले होते, तर सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ट्विट करून भाजपने २०१४ च्या जाहीरनाम्यात राम मंदिराचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अयोध्येत राम मंदिर बांधावे लागेल, असे वक्तव्य केले होते. त्याविषयी विचारले असता होसबळे हे सहसरकार्यवाह आहेत, भय्याजी जोशी हे सरकार्यवाह आहेत आणि मी सरसंघचालक आहे. त्यामुळे भय्याजींनी मांडलेली भूमिका योग्य असून तीच माझीही भूमिका आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

X