आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे आजोबा म्हणाले होते, चुकलो तर फटके मारा; आदित्य, आता फटके कोणाला मारायचे?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मा. आदित्य ठाकरे, शिवसेना नेता यांसी जय महाराष्ट्र 

आपण कमालीच्या व्यग्रतेतून लाखमोलाचा, खरे तर अब्जावधी रुपये किमतीचा वेळ काढत या शहरात आला आहात. त्यामुळे माझ्यासारखे तमाम १५ लाख औरंगाबादकर अक्षरश: धन्य झाले आहेत. कारण एकेकाळी हे शहर तुम्हा ठाकरे कुटुंबीयांसाठी सत्तेचे दार उघडून देणारे असले तरी या शहराच्या विकासाची दारे उघडण्यात तुम्हाला कधी मनापासून स्वारस्य आहे, असे आम्हाला वाटलेच नाही. एक-दीड वर्षापूर्वी तुम्ही शिवसेना नेते झालात. तेव्हा तुमची पायधूळ येथे अधूनमधून लागत राहील, त्यानिमित्ताने तुम्ही इथल्या तुमच्या कारभाऱ्यांच्या बैठका घ्याल. या शहराचे हाल-हवाल (खरे तर हालच) जाणून घ्याल आणि 'अरे बाबांनो, गेल्या २५-३० वर्षांपासून औरंगाबादकर कायम तुमच्या डोक्यावर सत्तेचा मुकुट ठेवत आले. त्याची आठवण ठेवून तरी या शहराचा विकास करा,' असे आठवणीने सांगाल, असे वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही. 

 

विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकदा आपण आलात. पण येथील ऊन सहन न झाल्याने तातडीने मुंबईला परतलात. त्यानंतर तुमची खबरबातच नव्हती. जणूकाय या शहराशी तुमचे सोयरसुतकच नाही, असे आम्हाला वाटू लागले होते. पण अखेर तुम्ही आलात, म्हणून धन्यता वाटते. पंचवीसची घोषणा करून आलेल्या चार का होईना बसचे लोकार्पण, एसटीपी प्लँटचे उद््घाटन आणि वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी संवाद असा आपला भरगच्च कार्यक्रम महापौर नंदकुमार घोडेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला आहे.

 

आदित्यजी, आपल्याकडे फारसा वेळ नाही, याची आम्हाला जाणीव आहे. पण तरीही एखादा तास काढून औरंगाबाद शहराच्या अंतर्गत भागात जरा फेरफटका मारा. जमलेच तर लोकांसाठी प्रतिष्ठा थोडी बाजूला ठेवून दुचाकीवर फिरा आणि इथल्या अनेक रस्त्यांची काय दुर्दशा झाली आहे, त्याचा अनुभव घ्या. अब्जावधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची वाट इतकी बिकट झाली आहे की त्यातून पायी चालणेही कठीण झाले आहे. औरंगाबादकरांनी कष्टाने जमवलेल्या पैशातून महापालिकेच्या तिजोरीत कर भरला. हा पैसा आमच्याच सेवेसाठी प्रामाणिकपणे वापरला जाईल, ही आमची अपेक्षा होती. त्यासाठीच तर औरंगाबादकरांनी तुमच्या पक्षाला नेहमीच महापालिकेची सत्ता दिली. पण सारा पैसा खड्ड्यात गेला आहे. कार्यक्रमस्थळी ये-जा करताना तुम्ही मोजक्या गुळगुळीत रस्त्यांवरून जाणार असल्याने तुम्हाला आमचे म्हणणे खरे वाटणार नाही. म्हणून आदित्यजी, एक फेरी नियोजित मार्ग सोडून मारा. तीही दिवसाच. कारण महापालिकेच्या कृपेने हजारो पथदिवे अंधार पडताच बंद होतात. म्हणजे तुम्हाला खड्डे जाणवतील, पण ते नेमके किती खोल हे दिसणार नाही. बरं, दोन वर्षांपूर्वी रस्त्यांसाठी १०० कोटी आले. त्यानंतर वाटे-हिश्श्यावरून इथे खेळ सुरू झाला. त्याच्या कहाण्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर तुम्ही तत्काळ खेळबंदीचा आदेश देऊ शकला असता. पण तेही झाले नाही. जसे रस्त्याचे तसेच पाण्याचेही आहे. तेरा वर्षांपूर्वी औरंगाबादच्या लाखो लोकांची तहान भागवण्यासाठी कागदावर आलेली समांतर जलवाहिनी योजना अजूनही कागदावरच आहे. तुमचे खासदार चंद्रकांत खैरे आणि तत्कालीन महापौर, आता भाजपवासी झालेले किशनचंद तनवाणी यांच्या वादात योजनेचे तीनतेरा वाजले. लोकांच्या डोळ्यात जास्त आणि नळाला कमी पाणी अशी स्थिती आहे. मार्च महिन्यात पडेगावला कचऱ्यावरून दंगल झाली. तेव्हा म्हणे तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करून कचरा समस्येबद्दल चर्चा केली. त्यापेक्षा तुम्ही महापौर आणि बाकीच्या मंडळींची थोडी कानउघाडणी केली असती तर फरक असता ना? 

 

तुमच्या वडिलांनी तर महिनाभराने मी येईन तेव्हा कचरा प्रश्न सुटला नाहीतर महापौरांचा राजीनामा घेईन, असे म्हटले होते. त्यांना त्याचा विसर पडला. तसे तुमचे होऊ नये. संभाजीनगर म्हणा नाही तर औरंगाबाद. पण लोकांना सुखाने झोपच येत नसेल तर नुसत्या नावाला काही उर्वरित अर्थ आहे का? १९८७-८८ मध्ये पहिल्यांदा महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला तेव्हा तुमचे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शहराच्या कानाकोपऱ्यात झळकले होते. त्यात तुमचे आजोबा म्हणाले होते, 'या शहराचे चित्र बदलून टाकू. एकदा संधी द्या. चुकलो तर फटके मारा.' दोन तपांपेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी शहराचे चित्र काही बदलले नाही. पण त्या वेळी सायकल, लुनावर फिरणारे तुमच्या पक्षाचे अनेक कारभारी आता आलिशान चारचाकीत फिरत आहेत. समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचेही दिसत नाही. मग सांगा आदित्यजी, तुमचे आजोबा म्हणाले होते त्यानुसार आम्ही कोणाला फटके मारावेत? ही भावना प्रत्येक औरंगाबादकराची आहे ! आहे उत्तर तुमच्याकडे? 

बातम्या आणखी आहेत...