Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | news about accident 4 killed

मद्यपी चालकाकडून ट्रक उलटला, कुटुंबातील चाैघांचा दबून मृत्यू, मदतीऐवजी बघ्यांनी लुटली साखर

प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 11:22 AM IST

अपघातात ट्रकखाली सापडलेला दुसरा दुचाकीस्वार फेकला गेल्याने वाचला

 • news about accident 4 killed

  माजलगाव - सावरगावच्या छत्रपती साखर कारखान्यातून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे ३० टन साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक दारूच्या नशेत नागमोडी ट्रक चालवत असताना अचानक ट्रक उलटला. त्याखाली एकाच दुचाकीवरून माजलगावकडे येत असलेल्या एकाच कुटुंबातील चाैघांचा दबून मृत्यू झाला. ही घटना दीपावली पाडव्याच्या दिवशी गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरील एचपी गॅस गोडाऊनजवळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दयानंद गणेश सोळंके (४० ), संगीता दयानंद सोळंके (३६), राजनंदिनी दयानंद सोळंके (७), पृथ्वीराज दयानंद सोळंके (५) अशी एकाच कुटुंबातील दांपत्य व मुलांची नावे आहेत. या अपघातात ट्रकखाली सापडला गेलेला दुसरा दुचाकीचालक मात्र फेकला गेल्याने वाचला असून पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे.


  दीपावली पाडव्यानिमित्ताने गंगामसला येथे मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन सोळंके कुटुंब माजलगावला परतत असताना हा अपघात घडला. अपघातात ट्रकखाली दबलेल्या सोळंके कुटुंबास बाहेर काढण्याऐवजी बघ्यांनी अपघातस्थळी मदत करण्याऐवजी ट्रकमधील साखरेच्या ६० पोत्यांतील दीड टन साखर लुटली. दयानंद सोळंके हे माजलगाव येथील एचडीएफसी बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शेती नसल्यामुळे ते माजलगावला चार वर्षांपूर्वी आले होते. माजलगाव शहरातील छत्रपतीनगर येथील यश अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतात. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने दयानंद सोळंके हे दुचाकीवरून पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांना घेऊन गंगामसला येथे तीन भावांना भेटण्यासाठी गेले होते.

  भावांना भेटल्यानंतर गोदावरी नदीच्या पात्रातील मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन दुचाकीवरून माजलगावकडे परतत असताना ट्रक (सीजी ०८ एसी ३३४१) चालक रूपेश सीताराम यादव हा सावरगावच्या छत्रपती साखर कारखान्यातून ट्रकमध्ये साखर भरून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे नागपूरमार्गे जाणार होता. वाटेत माजलगावजवळील एचपी गॅस एजन्सीच्या गोडाऊनजवळ चालकाने कट मारण्याचा प्रयत्न केला.

  परंतु ट्रक दुचाकीवरील सोळंके कुटुंबाच्या अंगावरच उलटला. यात दयानंद गणेश सोळंके, पत्नी संगीता दयानंद सोळंके, मुलगी राजनंदिनी, मुलगा पृथ्वीराज हे ट्रकखाली चेंगरून जागीच ठार झाले. गंगामसला गावावर या अपघाताने शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करून चारही मृतदेह ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

  अपघातानंतर ६० पाेती गायब

  सावरगावच्या छत्रपती साखर कारखान्यातून परभणीकडे साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रकचालक दारूच्या नशेतच नागमोडी पद्धतीने ट्रक चालवत असताना अचानक ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकमधील ३० टन साखर रस्त्यावर पडली. तेव्हा काही टन साखर सांडली तर ६० पाेत्यांतील दीड टन साखर बघ्यांनी लांबवली. हा प्रकार पाहून पोलिसांनी दोन ट्रक मागवून उर्वरित साखर त्या ट्रकमध्ये भरून ट्रक पोलिस ठाण्यात आणून लावला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

  यापूर्वी दोन अपघात
  दोन महिन्यांपूर्वी माजलगाव शहराजवळील मंगलनाथ कॉलनीजवळील बायपासवर रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलास अशा प्रकारे साखरेच्या ट्रकचालकाने चिरडले होते. त्या वेळीही ट्रकचालक दारूच्या नशेत होता. अशा मद्यपी ट्रकचालकांची माजलगाव ग्रामीण पोलिसांनी जागोजागी तपासणी करूच ट्रक सोडावेत. दारू पिऊन ट्रक चालवणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

  एकही दिवा पेटला नाही
  अपघातात ठार झालेल्या सोळंके कुटुंबातील चारही जणांचे मृतदेह गंगामसला गावात आणल्यानंतर एकाच चितेवर एका बाजूला वडील व दुसऱ्या बाजूला आई व दोघांच्या मध्ये दोन मुलांचे मृतदेह चितेवर ठेवून अग्निडाग देण्यात आला. हा प्रसंग पाहून गंगामसला येथील ग्रामस्थांचे डोळे पाणावले, काही नागरिक धाय मोकलून रडत होते. गावात दिवाळीच्या दिवशी एकही दिवा पेटला नाही. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

  फेकला गेलेला इर्शाद वाचला

  सावरगावच्या छत्रपती साखर कारखान्यातून निघालेला साखरेचा ट्रक माजलगावजवळील एचपी गॅस एजन्सीच्या गोडाऊनजवळ आला तेव्हा दारूच्या नशेतील चालक रूपेश सीताराम यादव नागमोडी ट्रक चालवत होता. हेलकावे खाणारा ट्रक उलटला तेव्हा ट्रकच्या खाली दोन दुचाकी अडकल्या. त्यात ट्रकच्या तोंडाजवळील अडकलेल्या दुचाकीवर इर्शाद ऊर्फ बाबू हा तरुण होता. त्याच्या अंगावर ट्रक कोसळताच तो बाजूला फेकला गेला. त्याची दुचाकी अडकली, परंतु तो वाचला. ट्रकच्या मध्यभागी सोळंके दांपत्य दुचाकीसह अडकले. त्यांच्या अंगावर साखरेची पोतीही कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

  पुढील स्लाईडवर पहा...संबंधित फोटो ...

 • news about accident 4 killed
  दयानंद व पृथ्वीराज.
 • news about accident 4 killed
  मृत संगीता सोळंके
 • news about accident 4 killed
  मृत राजनंदिनी सोळंके

Trending