आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराच्या तोफा लागल्या धडाडू: माघारीचा आज शेवटचा दिवस, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवून सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांचा आटापिटा सुरू आहे. इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करत घरोघर जाऊन प्रचाराला गती दिली. आता प्रचारासाठी अवघे १२ दिवस हातात असल्याने स्टार प्रचारकांच्या सभांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची रविवारी रात्री भिस्तबाग चौकात प्रचारसभा झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. तत्पूर्वी विजयात अडसर ठरणाऱ्यांच्या माघारीसाठी मनधरणी सुरू आहे.


शहरातील १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी तब्बल ७१५ अर्ज दाखल झाले. छाननीच्या वेळी हरकतदारांनी मातब्बरांना चांगलाच दणका दिला आहे. त्यात अपक्षांसह भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला आहे. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी, राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. योगेश चिपाडे, विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह मातब्बरांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय उरला. सोमवारी (२६ नोव्हेंबर) सुनावणी होईल. यात काय होईल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
छाननीनंतर अर्ज माघारीला सुरुवात झाली आहे. सोमवारी माघारीची अंतिम मुदत आहे.

 

आतापर्यंत आठ जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. राष्ट्रवादीच्या सुनीता मुदगल, प्रभाग १४ मधून संगीता भोसले यांनी माघार घेतली. स्नेहा छिंदम, राजेंद्र बोगा, वैशाली चव्हाण, प्रभाग दोनचे प्रकाश त्र्यंबके, सुमीत बटुळे, प्रभाग ४ मधील विनय वाखुरे यांनीही माघार घेतली. वाखुरे यांच्या माघारीनंतर अपक्ष उमेदवार इंद्रकौर गंभीर यांना राष्ट्रवादीकडून पुरस्कृत करण्याची शक्यता आहे. माघारीचा शेवटचा दिवस असल्याने निवडणुकीत अडचण येऊ नये, यासाठी अनेकांनी माघारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी खासगी बैठकीत मनधरणी सुरू आहे. त्याबरोबरच घरोघर प्रचारालाही इच्छुकांनी गती दिली आहे.


भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष दानवे यांची जाहीर सभा रविवारी झाली. शिवसेनेनेही स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आटोपताच सभांना सुरूवात होईल. शिवसेनेचे मंत्री, तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभांची रणधुमाळी पहायला मिळेल. राष्ट्रवादीकडून अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, नवाब मलिक, जयंत पाटील, दिलीप वळसे आदींच्या सभांचे नियोजन करण्यात येणार आहे.


वाखुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीचे उमेदवार विनय वाखुरे यांनी शनिवारी अर्ज मागे घेतला होता. रविवारी भिस्तबाग चौकात झालेल्या सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला आहे.

 

अवैध अर्ज, आज सुनावणी
उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या निर्णयाविरोधात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या ६ उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी (२६ नोव्हेंबर) या अर्जांवर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायलयाकडून कोणता निर्णय येणार याकडे उमेदवारांसह सर्वांचेच लक्ष लागले असून अनेकांची धाकधूक वाढली आहे.


अंतिम चित्र आज स्पष्ट
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गुरुवारी छाननी प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या मुदतीनुसार आतापर्यंत ८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. सोमवारी (२६ नोव्हेंबर) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. माघारी रिंगणातील उमेदवारांच्या अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच लढतीचा अंदाज बांधला जाईल.

बातम्या आणखी आहेत...