आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटी बससेवेचा विषय निवडणुकीत ठरणार कळीचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी करून विकासाचा आलेख जनतेसमोर मांडण्याचा खटाटोप सुरू आहे. दुसरीकडे विरोधी राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांकडून सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही महिन्यांपासून बंद असलेली शहर बससेवा (एएमटी) या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. ही सेवा तातडीने सुरू करण्यासाठी मनपाने संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यानुसार ६० दिवसांत सेवा सुरू करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तथापि, बससेवा सुरू न झाल्याने त्याचे खापर विरोधक सत्ताधाऱ्यांवर फोडत आहेत. 

 

नगरकरांना शहर बससेवा (एएमटी) आवश्यक असून उपनगरांत राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा जीवनवाहिनी आहे. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा बहुतेक खासगी बेकायदेशीर अॅपे रिक्षाचालकांच्या हातात गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. नागरिकांना बससेवेच्या तुलनेत जास्तीचे दर द्यावे लागतात. पूर्वीची शहर बससेवा मोडकळीस आल्याने कोणत्याही ठिकाणी बस बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होत होता. त्याबरोबरच बसची अवस्था बिकट झाल्याने प्रवासी जखमी होण्याचीही शक्यता होती. या पार्श्वभूमीवर मनपाने तत्कालीन एजन्सीधारकाला बससेवा दुरुस्त करण्याच्या वारंवार सूचना दिल्या, पण ही सेवा दुरुस्त झाली नाही. दुसरीकडे तत्कालीन यशवंत ऑटो या ठेकेदाराने १६ महिन्यांची थकीत असलेली सुमारे ८० लाखांची थकबाकी द्यावी, अशी मागणी पुढे केली. नंतर ही सेवा बंद पडल्याने १७ एप्रिलला नव्याने निविदा मागवण्यात आल्या. त्यानुसार दीपाली ट्रान्स्पोर्टला नवीन बसगाड्या देण्याची अट घालत स्थायी समितीने सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या सभेत मंजुरी दिली. 

 

दरम्यान, यशवंत ऑटो एजन्सीच्या धनंजय गाडे यांनी नव्याने बससेवा सुरू करण्यास आक्षेप घेतला. मनपाने थकीत ८० लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. नव्याने बससेवा सुरू करण्यास त्यांनी स्थगिती मागितली. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही सेवा सुरू करणे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान होते. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वीच बससेवा सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. ही सेवा सुरू करण्यासाठी ६० दिवसांची मुदत आहे. परंतु ही सेवा बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिलांची मोठी गैरसोय होत आहे. चढ्या दराने अव्वाच्या सव्वा दरात शहरात खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. ही सेवा अनेक दिवसांपासून बंद राहिल्याने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी मुद्दा मिळाला आहे. सत्ताधारी ही सेवा तातडीने सुरू करून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. 

 

शहर प्रवासी बससेवेसाठी दिला कार्यारंभ आदेश 
यापूर्वीची बससेवा जुनाट व खिळखिळी झाल्याने नागरिकांच्या जीवालाच धोका निर्माण झाला होता. बस दुरुस्त करण्यासाठी वारंवार संबंधित ठेकेदार एजन्सीला कळवण्यात आले होते, पण त्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे नव्याने निविदा काढून बससेवा सुरू करण्यात येत आहे. आता कार्यारंभ आदेशही दिला असून ६० दिवसांत ही सेवा सुरू होईल. नवीनच बसगाड्या असणार आहेत.'' सुरेखा कदम, महापौर. 

 

महापालिकेने थकबाकी अदा केल्यास आम्ही सेवा देण्यास तयार : धनंजय गाडे 
आमची मनपाकडे बससेवेच्या नुकसान भरपाईपोटीची थकबाकी आहे. आमच्या २१ बसगाड्या उभ्या असून, मनपाने थकबाकी अदा केल्यास बसगाड्या दुरुस्ती करून बससेवा सुरू करण्याची आमची तयारी आहे. आम्ही न्यायालयातही धाव घेतली असून त्यावर न्यायालयीन कामकाज सुरू आहे, अशी माहिती यशवंत ऑटोचे संचालक धनंजय गाडे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली. 

 

सत्ताधाऱ्यांचे अपयश सिद्ध 
मी महापौर असताना सर्वोत्कृष्ट प्रसन्न पर्पलची बससेवा सुरू केली होती. त्यानंतर पुन्हा माझ्याच कार्यकाळात यशवंत ऑटोची दुसऱ्यांचदा बससेवा सुरू केली. पण नगरकरांना ही सेवा देण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यांनी केवळ स्टंटबाजी अन् पेपरबाजी केली. आता सत्ताधाऱ्यांचे अपयश सिद्ध झाले असून ते मतपेटीतून सिद्ध होईल.'' संग्राम जगताप, आमदार. 

 

बातम्या आणखी आहेत...