Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | news about ahmednagar municipal corporation

प्रारूपरचनेची शिळ्या कढीला फोडणी; उशिरापर्यंत ऑनलाइन नव्हती अधिसूचना

प्रतिनिधी | Update - Aug 28, 2018, 11:13 AM IST

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (२४ ऑगस्ट) सोडत काढण्यात आली.

 • news about ahmednagar municipal corporation

  नगर- महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (२४ ऑगस्ट) सोडत काढण्यात आली. त्याच दिवशी प्रभागाच्या चतु:सीमा व समाविष्ट भागासह नकाशे मनपाच्या आवारात प्रसिद्ध करण्यात आले होते. पण कोणती कॉलनी, नेमकी कोणाच्या प्रभागात समाविष्ट झाली, याबाबत नगरसेवकांसह इच्छुकांत मोठा संभ्रम आहे. प्रभाग रचनेची अधिसूचना सोमवारी जाहीर होणार असल्याने नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मनपात गर्दी केली होती. त्यावेळी प्रशासनाने शिळ्या कढीला फोडणी देत शुक्रवारी प्रसिद्ध केलेले नकाशेच मनपात डकवले. त्यामुळे नगरसेवक गॅसवर आहेत.


  महापालिकेच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचनेबाबत कमालीची उत्सुकता नगरकरांमध्ये होती. महापालिकेच्या आयुक्तांनी शुक्रवारी नागरिकांचा मागासप्रवर्ग व महिला आरक्षणाबाबत सोडत काढली. त्याच दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे मनपाच्या आवारात प्रसिद्ध करण्यात आले. या नकाशांमुळे प्रभागांची दिशा व महत्त्वपूर्ण भाग स्पष्ट झाले. तथापि, प्रभागातील प्रत्येक गल्ली किंवा कॉलनीचा या नकाशात दाखवलेल्या भागात नसल्याने इच्छुकांसह नगरसेवकांमध्ये कामालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.


  प्रभागरचनेबाबत राज्य निवडणूक अायोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसुचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवली होती. अधिसूचनेत प्रभागातील दिशानुसार समाविष्ट भाग स्पष्ट होण्याची प्रतीक्षा नगरसेवकांमध्ये होती. सोमवारी सकाळपासून सामान्य प्रशासन विभागासमोर गर्दी केली होती. पण, सायंकाळी उशिरापर्यंत अधिसूचना शासन राजपत्रात दिसली नाही. दरम्यान, मनपा प्रशासनाने दुपारी कार्यालयात शुक्रवारी प्रसिद्ध केलेले नकाशेच पुन्हा डकवले. त्यामुळे नगरसेवकांमधील संभ्रम वाढला आहे. हरकतीची मुदत सोमवारपासून ५ सप्टेंबरपर्यंत अाहे. तथापि, प्रभागातील सर्व भाग स्पष्ट होत नसल्याने, हरकती कशाच्या आधारावर घ्यायच्या असा प्रश्न नगरसेवकांसमोर आहे.


  दोन हरकती दाखल
  हरकती दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. महावीर पोखर्णा यांनी चार सदस्यीय रचनेवरच हरकत घेतली आहे. द्विसदस्यीय रचनेतच विकासकामे करताना नगरसेवकांची दमछाक झाली. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग रचना असावी, अशी हरकत त्यांनी घेतली. याव्यतिरिक्त आणखी एकाने प्रभागरचनेबाबत हरकत घेतली आहे.

Trending