Home | Maharashtra | Vidarva | Akola | news about akola municipalty

अकोला: थकीत मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करा; नाही तर निलंबन, आयुक्‍तांचा इशारा

प्रतिनिधी | Update - Aug 05, 2018, 01:16 PM IST

महापालिकेच्या महासभेने थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणाऱ्या व्याजा (शास्ती) चा बोजा नागरिकांवर पडू नये, यासाठी अभय योज

 • news about akola municipalty
  अकोला - महापालिकेच्या महासभेने थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणाऱ्या व्याजा (शास्ती) चा बोजा नागरिकांवर पडू नये, यासाठी अभय योजना राबवली. या योजनेला सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. मात्र कर वसुली लिपिकांकडून वसुली मात्र केली जात नाही. ही सर्वथा चुकीची बाब असून थकीत मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करा अथवा निलंबनाची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मालमत्ता कर विभागाला दिला.

  महापालिकेच्या मुख्य सभागृहात ४ ऑगस्ट रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महापालिकेने मागील वर्षापासून अधिनियमातील तरतुदीनुसार थकीत मालमत्ता करावर व्याजाची (शास्ती) आकारण्याचा निर्णय घेतला. महापालिकेला नागरिकांकडे ५० कोटी रुपयाचा कर थकीत आहे. तर महिन्याकाठी २ टक्के व्याज आकारला जातो. ज्या नागरिकांनी वर्ष, दोन वर्षाच्या कराचा भरणा केला नाही, त्यांना २४ ते ४८ टक्के व्याजाचा भरणा करावा लागतो. यामुळे मालमत्ता कराच्या देयकापेक्षा दंडाची रक्कम अधिक होत आहे. ही बाब लक्षात घेवून नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसू नये,या अनुषंगाने महापालिकेने अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला. महासभेने या योजनेला ३१ जानेवारी पर्यंत मंजुरी दिली. त्यानंतर पुन्हा ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या योजनेला मुदतवाढ देताना अनेक नागरिकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा केला. मात्र या योजनेची माहिती अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून थकीत मालमत्ता कराची वसुली करण्याची जबाबदारी कर वसुली लिपिकांनी पूर्णपणे पार पाडली नाही. कर वसुली लिपिक दररोज वसुली करताना थकीत मालमत्ता धारकांकडे वसुलीचा तगादा लावला असता तरी या योजनेला मुदतवाढ दिल्याचा फायदा जसा नागरिकांना तसाच महापालिकेलाही झाला असता. मात्र थकीत मालमत्ता कर धारक येतील आणि थकीत कराचा भरणा करतील, या आशेवर कर वसुली लिपिक बसल्याने विशेष वसुली झाली नाही. या सर्व बाबींवर आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जोरदार आक्षेप घेतला.

  आयुक्त म्हणाले, महासभा एकीकडे अभय योजनेला मुदतवाढ देत आहे आणि आपण मात्र कार्यालयात बसून वसुलीची वाट पाहतो आहेत. ही सर्वथा चुकीची बाब आहे. प्रत्येक कर वसुली लिपिकाने किती थकीत कराची वसुली केली? याची माहिती घेतल्या नंतर आयुक्तांनी कर वसुली लिपिकांना चांगलेच धारेवर धरले. आता थकीत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

  अनेक लिपिक थकीत मालमत्ता धारकांपर्यंत पोहोचलेच नाही
  कर वसुली लिपिकांकडे तीन ते साडेतीन हजार मालमत्तांची वसुली असते. ही वसुली आपापल्या भागात जावून करावी लागते. एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत किमान एक हजार ते दीड हजार मालमत्ता धारकांपर्यंत पाेहोचणे गरजेचे होते. मात्र अनेक कर वसुली लिपिक दिवसाला एक या नुसार थकीत मालमत्ता धारकांपर्यंत पोहोचल्याची बाबही या बैठकीत स्पष्ट झाली.

  अनेकांनी दिली विविध कारणे
  अनेक मालमत्ता कर वसुली धारकांनी वसुली न झाल्याची विविध कारणे दिली. यात काही कारणे ही हास्यास्पद होती. तर अनेकांनी यापूर्वीच कर वसुलीतून दुसऱ्या विभागात बदली करण्याची मागणी केली होती.

Trending