आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकटात दारू न दिल्याने 'देशी'च्या दुकानामधील कामगाराचा केला खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी गेलेल्या गुंडाने फुकटात दारू मागितली. मात्र कामगाराने नकार दिल्यानंतर त्याला चाकूने भोसकले. त्यात कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी लहान उमरीत घडली. श्रीकांत कृष्णराव सोनुकुले (वय ३७, रा. लहान उमरी) असे मृतक मजुराचे नाव आहे.


श्रीकांत सोनुकुले हे लहान उमरीतील पंत यांच्या देशी दारूच्या दुकानात काम करतात. दररोज सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते दुकानात कामाला आले. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या दुकानात रणजित वाघ हा गुंड प्रवृत्तीचा युवक नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी आला. त्याने श्रीकांत सोनुकुले यांना फुकटात दारू मागितली.


आधी पैसे दे असे म्हटल्यावर आरोपीने त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आरोपी दुकानाच्या बाहेर गेला आणि काही वेळाने पुन्हा आला आणि श्रीकांत यांच्या पोटात चाकूने सपासप वार केले. प्रतिकार करण्यापूर्वीच श्रीकांत रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

घटनेची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार वसंत मोरे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील सोळंके घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर तत्काळ आरोपी रणजित वाघ याला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सुरुवातील भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र दुपारी अडीच वाजताच्या सुमारास श्रीकांत यांची प्राणज्योत मालवल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३०२ ची वाढ केली.

 

आरोपीची पृष्ठभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पृष्ठभूमी गुन्हेगारी असून त्याच्याविरुद्ध पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत. तो नियमितपणे दारूच्या दुकानात जात असे. त्याचे लाड पुरवल्यानेच ताे नियमित दारू पिण्यासाठी पंत यांच्या देशी दारूच्या दुकानात जात असे.

बातम्या आणखी आहेत...