आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्यावरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा पदव्या परत करणार, अतिरेक्याच्या शोकसभेचा वाद, कारवाईवर विद्यार्थ्यांची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगड - पीएचडी ते दहशतवादी बनलेल्या व चकमकीत ठार झालेल्या मन्नान वानीसाठी अलिगड मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) शोकसभा आयोजित करण्यावरून वाद वाढला आहे. विद्यापीठाचे प्रशासन काश्मिरी विद्यार्थ्यांशी भेदभावाची वागणूक देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये वानीची शोकसभा आयोजित करण्यात आली नव्हती. उलट काश्मिरी विद्यार्थ्यांच्या विरोधात कट रचून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप करण्यात आला आहे. 

 

देशद्रोहाचा खटला व निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली नाही तर १७ ऑक्टोबर रोजी सर सय्यद दिनाच्या निमित्ताने १२०० काश्मिरी विद्यार्थी आपल्या पदव्या विद्यापीठाच्या प्रशासनाकडे सोपवतील, असा असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वानीचा खात्मा झाल्यानंतर एएमयूमध्ये त्याच्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्याचा प्रयत्न झाला होता. या आरोपाखाली दोन जणांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय कट रचल्याच्या आरोपावरून सात जणांना नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. 

 

चार दिवसांपूर्वी अतिरेक्यांचा खात्मा : कुपवाडाच्या हंदवाडामध्ये चार दिवसांपूर्वी मन्नानसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. वानी एएमयूचा हुशार विद्यार्थी मानला जातो. शिक्षण सुरू असताना तो हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला. वानीला ठार केल्याचे कळाल्यानंतर अलिगड मुस्लिम विद्यापीठात काही विद्यार्थी एकत्र होते. त्यांनी वानीसाठी येथे प्रार्थनेस सुरुवात केली होती. त्याची माहिती विरोधी गटापर्यंत पोहोचली. त्यानंतर हे प्रकरण तापले. 

जम्मू-काश्मीर पोलिस म्हणाले- सीमा आेलांडून मन्नान उत्तर काश्मीरला पोहोचला होता, दहशतवाद्यांना प्रशिक्षणाचा उद्देश 
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मन्नानबद्दलची आणखी महत्त्वाची माहिती रविवारी जाहीर केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मन्नान नियंत्रण रेषा आेलांडून पाकिस्तानव्याप्त काश्मीरला जाण्यासाठी दक्षिण काश्मीरमधून उत्तर काश्मीरला गेला होता. गेल्या सोमवारी तो उत्तर काश्मीरला पोहोचला होता. गुप्तचर यंत्रणेच्या त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष होते. मन्नानने बंदूक हाती घेण्याऐवजी आपल्या प्रक्षोभक लेखन शैलीतून तरुणांना दहशतवादी संघटनांशी जोडले पाहिजे, अशी दहशतवादी संघटनेची इच्छा होती. त्याने लिहिलेले संदेश कट्टरवारी होते. मन्नानच्या म्होरक्यालाही हेच हवे होते. त्यांना मन्नान मारला जाऊ शकेल, अशी भीती वाटत होती. 

 

मागणी पूर्ण न झाल्यास १२०० विद्यार्थी परत जातील 
एएमयूच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष व काश्मीर विद्यार्थी सज्जाद सुभम राठर या संघटनेने विद्यापीठाच्या प्रशासनाला एक धमकी देणारे पत्र पाठवले आहे. आम्हा सर्व काश्मिरी विद्यार्थ्यांना स्वत:च्या सुरक्षेची चिंता वाटते. विद्यापीठाने आमच्या मागण्यांची पूर्तता केली नाही तर आम्ही सर्व १२०० विद्यार्थी विद्यापीठ सोडून निघून जाऊ. त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला. विद्यापीठाने पाठवलेल्या पत्रात भारतीय दंड विधानाचा उल्लेख आहे. त्यावरून विद्यार्थी घाबरलेले आहेत. 

 

एएमयूच्या आरोपी विद्यार्थ्यांची माहिती मागवली 
यूपी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांबद्दलची माहिती मागवली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस तपशील देणार आहेत, असे पोलिस अधिकारी अजयकुमार साहनी यांनी सांगितले. साहनी म्हणाले, आरोपी विद्यार्थ्यांची माहिती काढत आहोत. त्याशिवाय एसआयटी स्थापना केली होती. आरोपी विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? याच्या माहिती मिळाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. 

 

मनुष्यबळ मंत्रालयाने अहवाल मागवला 
मन्नानला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दखल घेतली आहे. मंत्रालयाने एएमयू प्रशासनास अहवाल देण्याचे आदेश बजावले आहेत. विद्यापीठाकडून मनुष्यबळ विकास मंत्रालयास अहवाल पाठवण्यात आला आहे, असे एएमयूचे निबंधक अब्दुल हामीद यांनी सांगितले. या प्रकरणात विद्यापीठाने एक तपास समिती स्थापन केली आहे. समितीला ७२ तासांच्या आत विद्यापीठ प्रशासनाला आपला अहवाल सोपवावा लागणार आहे. या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...