आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला जमा करायचे होते 450 कोटी, तिजोरीत केवळ 72

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील मालमत्ता करापोटी चालू आर्थिक वर्षात ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु, आर्थिक वर्ष संपण्यास फक्त तीन महिने बाकी असताना देखील मनपाने फक्त ७२ कोटी रुपये जमा केले आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यात ३७८ कोटी रुपये कसे वसूल होणार, असा प्रश्न मनपासमोर निर्माण झाला आहे. 

 

मालमत्ता कर व पाणीपट्टीची शहरात कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. सद्य:स्थितीत ठेकेदारांचे १७० कोटी रुपये देणी बाकी आहेत. ही बिले मिळण्याची सध्या शक्यता नसल्याने पुढील कामे घेण्यास कंत्राटदार समोर येत नसल्याचे चित्र आहे. वारंवार निविदा प्रसिद्ध करूनही कोणी कामे घेत नसल्याचे अधिकारी सांगतात. महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महापौर, पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने विशेष वसुली मोहीम राबवण्यात आली. त्यात सात दिवसांत ११ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले; मात्र बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यात प्रशासन व पदाधिकाऱ्यांना अपयश आले. 

 

त्यामुळे डिसेंबर संपला तरी अद्याप १०० कोटी रुपये सुद्धा तिजोरीत जमा होऊ शकले नाहीत. या आर्थिक वर्षात ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरअखेर तिजोरीत केवळ ७२ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत म्हणजेच मार्चअखेरपर्यंत वसुलीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. येत्या तीन महिन्यात ३७८ कोटी रुपये कसे वसूल होणार, असा प्रश्न महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पडला आहे. 

बातम्या आणखी आहेत...