आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका ठप्प! 3.8 लाखांवर कर्मचारी उत्सवासाठी सुटीवर; आणीबाणीतील सेवेसंबंधी चार लाख कर्मचारी विनावेतन करणार काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेत सरकारी खर्चासंबंधी विधेयकाच्या मंजुरीविनाच काँग्रेसचे (संसद) कामकाज स्थगित झाले आहे. त्यामुळे देशातील सरकारी कामकाज आंशिक पातळीवर ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे. 

 

स्थानिक वेळेनुसार शनिवारी पहाटेपासूनच महत्त्वाच्या सर्व संस्थांचे कामकाज बंद झाले आहे. त्यास नाताळनिमित्त शटडाऊन असे संबोधले जात आहे. ३.८ लाख कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत तर आणीबाणीच्या सेवेशी संबंधित सुमारे चार लाख कर्मचारी विना वेतनाचे काम करतील. अर्थात सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढणार आहे. राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिकचे सिनेटर यांच्यात मेक्सिको सीमेवर बांधल्या जाणाऱ्या भिंतीच्या (मेक्सिकोची वादग्रस्त भिंत) निधी पुरवठ्यावरून वाद निर्माण झाला. हा विषय ताणला गेला. ट्रम्प मेक्सिको-अमेरिकेदरम्यानच्या सीमेवरील भिंतीसाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या (५ अब्ज डॉलर) निधीची मागणी करू लागले आहेत. मात्र या निधीच्या प्रस्तावाला डेमोक्रॅटिकच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले होते. त्यातून ही स्थिती निर्माण झाली आहे. यंदाचा हा तिसरा शटडाऊन आहे. 

 

परिणाम काय  : कार्यकाळाचा दुसरा वर्धापन दिन होणार नाही  
> राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली आहेत. द्विवर्षपूर्ती निमित्त राष्ट्राध्यक्ष उत्सव साजरा करू शकणार नाहीत. हा शटडाऊनचा पहिला परिणाम दिसून येणार आहे. 
> ओव्हल कार्यालयात ट्रम्प यांनी सिनेटमधील अल्पसंख्यांक नेते चक शूमर यांच्यासमवेत सरकारचे कामकाज चालावे यासाठी करार करण्याचे प्रयत्नही करून पाहिले. परंतु ते निरुपयोगी ठरले. 
> सैन्य व अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना विनावेतन काम करावे लागणार आहे. 
> आणीबाणीशी संबंधित चार लाख कर्मचाऱ्यांना आता विनावेतन काम करण्याची वेळ.
> नासाचे बहुतांश कर्मचारी घरी पाठवले जातील.
> गृह, सुरक्षा, न्याय, कृषी व परराष्ट्र विभागाचे कार्यालये सुरू राहतील. मात्र वेतन मिळणार नाही. 
> राष्ट्रीय उद्याने सुरू राहतील, पण अनेक उद्यान कर्मचारी नाताळनिमित्त घरी परततील.

ट्रम्प यांनी शुक्रवारी सीमेवरील भिंतीसाठी निधी जारी करण्यात आला नाही तर त्यांचे सरकार शुक्रवार-शनिवारी मध्यरात्रीपासून शटडाऊन करेल, असा इशारा दिला होता. नाताळच्या तोंडावर ट्रम्प यांनी घेतलेल्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सर्वांचा तिळपापड झाला आहे. एक दिवस आधी ट्रम्प यांच्यावर नाराज  असलेले संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी शुक्रवारी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. ट्रम्प यांनी या प्रकरणात १० डिसेंबर रोजी धमकी दिली होती. राष्ट्राध्यक्षांनी तापटपणातून देशाला ‘ट्रम्प शटडाऊन’मध्ये ढकलले आहे, अशा शब्दांत सिनेटमधील विरोधी पक्षनेते चक शूमर व पॅलोसी यांनी संयुक्त वक्तव्यात अशी नाराजी व्यक्त केली. 

 

४२ वर्षांत पहिल्यांदाच एका वर्षात तिसऱ्यांदा शटडाऊन
अमेरिकेत ४० वर्षांत पहिल्यांदाच शटडाऊन होण्याची ही एकाच वर्षातील तिसरी घटना आहे. यंदा २० ते २२ जानेवारी व ९ फेब्रुवारी रोजी सहा तासांंचे शटडाऊन झाले होते. दोन्ही वेळा वादग्रस्त इमिग्रेशनचा मुद्दा  त्याचे कारण ठरला होता. गेल्या पाच वर्षांत २०१३ मध्ये सर्वात मोठे शटडाऊन झाले होते. ते १६ दिवस चालले होते. देशात पहिल्यांदा १९७६ मध्ये शटडाऊन झाले होते. आतापर्यंत १८ वेळा शटडाऊन झाले. 

 

^हे शटडाऊन २०१३ च्या तुलनेत फार परिणाम करणारे नाही. लष्कर अजूनही काम करणार, सीमेवर पहारा दिला जाणार आहे. अग्निशमन कर्मचारीही काम करतील. उद्याने सुरू राहणार आहेत. परंतु या सर्व ठिकाणी लोकांना आर्थिक फटका बसणार नाही. - मिक मुल्वानी, संचालक, निधी व्यवस्थापन , ओव्हल कार्यालय

बातम्या आणखी आहेत...