आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शहा : काही तरी गमावून युती करणार नाही, चंद्रकांतदादा : चर्चा सुरू, मात्र आता उशीर नकाेच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई- राज्यात लाेकसभा- विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती हाेणार का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. बुधवारी रात्री नवी दिल्लीत झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेशी मैत्रीसाठी अनुकूलता दर्शवतानाच 'युतीसाठी पक्ष काही गमावून तडजाेड करणार नाही,' असे स्पष्ट संकेतही दिले हाेते. त्यामुळे भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळातून सुरू झाली हाेती. दरम्यान, शहांचे निकटवर्तीय व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मात्र त्याचे खंडन केले. 'राज्यात युतीची चर्चा याेग्य दिशेने सुरू आहे,' असे सांगत 'आता फार उशीर करण्यात अर्थ नाही,' असे मतही शिवसेनेला उद्देशून व्यक्त केले. 

 

अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्रात लाेकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी बुधवारी रात्री त्यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप खासदारांशी चर्चा केली. 'केंद्र व राज्य सरकारच्या याेजना जनतेपर्यंत पाेहाेचवा' यांसारखा सल्ला देतानाच जागावाटपात शिवसेनेचा ताठरपणा कायम राहिल्यास प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवा,' असा संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू हाेती. माेदी, शहा, फडणवीस, दानवे यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी आजवर शिवसेनेशी युती करण्याबाबत अनुकूल वक्तव्ये केलेली आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३ राज्यांत भाजपला माेठा झटका बसल्याने त्याचा फायदा घेत शिवसेना आपले महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपवर दबाव वाढवून जास्त जागा पदरात टाकून घेण्याचा प्रयत्न असल्याने एकाही शिवसेना नेत्याने युतीबाबतच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. 'ऐनवेळी उद्धव ठाकरेच याेग्य ताे निर्णय घेतील' एवढेच ठाेकळेबाज उत्तर शिवसेनेकडून दिले जात आहे. त्यामुळे भाजपचे नेतेही संभ्रमात आहेत.

 

शिवसेनेला हवी लोकसभा, विधानसभेची एकत्र बाेलणी 
लाेकसभा निवडणुकीसाठी युती करण्याबाबत भाजप उतावीळ असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या प्रस्तावाला स्पष्ट नकारही दिलेला नाही. माेदींवर टीका करतानाच 'अयाेध्येत राम मंदिर व शेतकऱ्यांचे प्रश्न' या मुद्द्यावर सहमती झाल्यास भाजपला पाठिंब्याचा विचार करण्याचे अप्रत्यक्ष संकेतही ते देत आहेत. २०१४ च्या निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता शिवसेनेला लाेकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची एकत्रच बाेलणी हवी आहे. ती अट भाजपने मान्य केल्यास शिवसेनेकडूनही चर्चेला प्रतिसाद मिळू शकताे, अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळत आहे.