आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर दंडाचे 'डास' मनपा आरोग्य निरीक्षक, कंत्राटदारांना 'चावले'; स्वच्छतेसाठी दिरंगाई केल्याने ठोठावला दीड लाखांचा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहर तापाने फणफणत असल्याने महानगर पालिका प्रशासनाचे लक्तरे डासांनी वेशीवर टांगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, यावर फवारणी म्हणून प्रशासनाने धडक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला असून, आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांना सुमारे दीड लाखांचा दंड ठोठावला. कर्तव्यात कसूर केल्याने जनसामान्यांचा 'ताप' वाढवणाऱ्या आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांनाच दंडाचे 'डास' चावल्याने तापाचे रुग्ण कमी होतील का असा सवाल मात्र शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

 

शहर मागील काही दिवसांपासून तापाने फणफणत आहे. प्रत्येक घरी तापाचे रुग्ण आढळून येत असून नागरिकांमध्ये डेंगू, मलेरिया आदीच्या तापामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शहरातील अनेक वस्त्यांमधील सर्व्हीस गल्ल्यामधील नाल्या उघड्या असल्यामुळे या नाल्या डासांचे वसतिगृह बनले आहे. घरात डास प्रतिबंधक उपाययोजना करूनही डासांकडून चावे घेतले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मनपाच्या आयुक्तांनी धडक कार्यवाहीचा सपाटा सुरू केला अाहे. स्वच्छतेबाबत कामचुकारपणा करणाऱ्या आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांना दंड आकारण्यात आला आहे. झोन क्रमांक एक मधील प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन, पाच, सहामधील आरोग्य निरीक्षक व कंत्राटदाराला सुमारे ८८ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्याचप्रमाणे प्रभाग आठ, दहा मध्ये एकूण ४० हजार रुपये दंड आकारण्यात आला. झोन क्रमांक दोन मधील दोन आरोग्य निरीक्षकांना प्रत्येकी दोन हजार रुपये, झोन क्रमांक पाच मधील प्रभाग क्रमांक १७ मधील कंत्राटदाराला २० हजार व आरोग्य निरीक्षकाला २ हजार रुपये दंड आकारण्यात आला. झोन क्रमांक चार मधील प्रभाग क्रमांक १९ मधील कंत्राटदाराला १० हजार तर प्रभाग क्रमांक २२ मधील कंत्राटदाराला १० हजार रुपये दंड आकारण्यात आला. आयुक्त संजय निपाणे यांनी प्रसाद कॉलनीत पाहणी केली असता काही ठिकाणी कचरा आढळून आल्याने कंत्राटदाराला २० हजार तर आरोग्य निरीक्षकाला २ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

 

धुरळणी व फवारणीसाठी चमू तयार
आयुक्त निपाणे यांनी आज राजापेठ गोदामाची पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. धुरळणीसाठी २० जणांची एक अशा पाच चमू धुरळणी यंत्रासह सज्ज करण्यात आल्या. या चमुला दोन पाळीत फवारणी व धुरळणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. झोन क्रमांक १ मध्ये ८० जणांची चमू तयार करण्यात आली असून फवारणी व धुरळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. या चमुच्या नियंत्रणाची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...