आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना काैन? मंदिर ताे हम ही बनवायेंगे!:विहिंप कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या-  राममंदिराचा मुद्दा हाती घेऊन अयाेध्येत अालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दाैरा यशस्वी झाला. त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाची जगभर चर्चाही झाली. शिवसेना अयाेध्या साेडत असताना रविवारी विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा तेथे होत होती. आपल्या सभेपूर्वीच शिवसेनेची चर्चा सुरू झाल्याचा राग विहिंप कार्यकर्त्यांमध्ये दिसून अाला.

 

‘वो शिवसेना वाले कौन हैं? हम सालों से लड रहे हैं, पेडा क्या अब वो खायेंगे? मंदिर तो हम ही बनायेंगे, अब तो हमे सरकार की भी जरूरत नहीं’ अशा संतप्त प्रतिक्रिया विहिंपमधून एेकायला येत हाेत्या. रविवारी विश्व हिंदू परिषदेचे किमान अडीच लाख कार्यकर्ते शहरात असतील, असा पोलिसांचा अंदाज होता. या कार्यकर्त्यांत तरुणांचा भरणा जास्त होता. त्यामुळेच कदाचित ठाकरे यांनी लवकर अयोध्या सोडावी, अशी पोलिसांची इच्छा होती. परिणामी ११ वाजता सुरू होणारी ठाकरे यांची पत्रकार परिषद लवकर म्हणजे १० वाजून ४० मिनिटांनी सुरू झाली आणि बरोबर ११ वाजेच्या वेळेला संपली. त्यामुळे काही स्थानिक पत्रकार पोहचू शकले नाहीत.

 

जेथे ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती त्या हॉटेलसमोरूनच गोरखपूर-लखनऊ महामार्ग जातो. त्या मार्गावरून विहिंपच्या कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे अयोध्येत येत होते. ‘जय श्रीराम’ ‘मंदिर तो अब बनेगा’ अशा घोषणा देत हाेते. ट्रॅफिक जाम झाली हाेती. त्यातील काही 
कार्यकर्त्यांशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला असता त्यांनी शिवसेनेच्या या भूमिकेविषयी राग व्यक्त केला. एक विहिंप कार्यकर्ता म्हणाला, ‘अाम्हाला ना शिवसेनेची गरज अाहे ना माेदी सरकारची. आतापर्यंत अाम्ही सरकारवर विसंबून राहिल्याने मंदिर उभे राहू शकले नाही. परंतु आता तसे होणार नाही. आता ‘सरकार बिरकार कुछ नहीं, हम रामलल्ला के भक्त है, हमारी जिम्मेदारी हम पूरी करेंगे’ असा दावा ही मंडळी करत हाेती.  

 

कार्यकर्त्यांच्या हाती नंग्या तलवारी, पाेलिसही हतबल

बस, ट्रकने दाखल होणाऱ्या काही विहिंप कार्यकर्त्यांच्या हाती थेट नंग्या तलवारी होत्या. पाेलिसांची तमा न बाळगता ते जाहीरपणे तलवारी दाखवत हाेते. मोटारीच्या दरवाजात उभे राहून काही जण भगवे ध्वज फडकवत होते. याबाबत बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला विचारणा केली तेव्हा तो म्हणाला, ‘ये आपका महाराष्ट्र नहीं है साब. ये लाेग जब तक अयोध्या में है, उन्हे पुलिसगिरी पसंद नहीं. हम कुछ भी नहीं कर सकते. क्योंकि ये लाखों में हैं, और सब जोश मैं हैैं. आयबी का भी कहना है पुलिस ने कुछ किया तो पंगा हो जायेगा....’ 

 

शिवसैनिकांनी अयोध्या लवकर सोडावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न
विश्व हिंदू परिषदेच्या रविवारच्या सभेमुळे गडबड होण्याची शक्यता असल्यामुळेच कदाचित शिवसैनिकांनी तातडीने अयोध्या सोडावी यासाठी पाेलिसांचे प्रयत्न सुरू हाेते. शनिवारी रात्री पोहोचलेल्या शिवसैनिकांना लॉज किंवा हॉटेल मिळणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे शनिवारी रात्री अनेकांना रस्त्यावर झोपावे लागले. पोलिसांनी लॉजची तपासणी करत शिवसैनिकांना जागा देऊ नका, असे अलिखित आदेश दिले होते. आम्हाला जागा मिळत नाही, विश्व हिंदू परिषदेच्या लोकांना कशी मिळते, असा सवाल माजी नगरसेवक गोपाल कुलकर्णी यांनी केला; खरा पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

 

खूप नियम तोडले, त्यामुळे रेकॉर्डिंग नाही : खासदार संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी धर्मगुरूंशी संवाद केला. तेथे कोणालाही प्रवेश नव्हता. त्यामुळे खासगीत काय चर्चा झाली याची उत्सुकता पत्रकारांना होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या. तेव्हा पत्रकारांनी विचारले की संवाद सुरू असताना कोणी रेकॉर्डिंग केली नाही का? असेल तर कृपया द्या ना. तेव्हा राऊत म्हणाले, ‘येथे आम्ही आतापर्यंत खूप नियम तोडले आहेत. परंतु साधु-संतांसोबत संवाद साधताना नियम तोडणे योग्य नाही.’

 

अयाेध्येतील शिवसैनिकांची दबंगगिरी; गाड्यांवर माेठमाेठे धनुष्यबाण
महाराष्ट्राप्रमाणे अयाेध्येतही शिवसेना पदाधिकाऱ्यांची दबंगगिरी दिसून अाली. मोटारींवर मोठ्या अक्षरांत लिहिलेली नावे, त्यावर बाळासाहेबांचा फोटो अन् धनुष्यबाण. त्यांच्या मोटारीच्या पाठेमागे किमान दोन मोटारी. ‘आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. लोकांचे आम्ही संरक्षण करतो. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात,’ असेही ते सांगतात.

 

बातम्या आणखी आहेत...