आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमची मदत घेऊनच करा औरंगाबादला 'स्मार्ट सिटी', मंथन देशभरातून आलेल्या तज्ज्ञांनी सुचवले विविध उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ऐतिहासिक शहर म्हणून जगभर ख्याती मिळवलेल्या औरंगाबादचे नाव आता खड्डे आणि कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जात आहे. आता ही ओळख पुसण्याचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पातून होणार आहे. या प्रकल्पाद्वारे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होऊन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकतील. मात्र, सर्व कामे महापालिकाच करेल, अशी भावना ठेवू नका. प्रत्येकाने हे माझे शहर म्हणून पुढे येत जबाबदारी घेतल्यास शहर स्मार्ट होईल. त्यासाठी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट कमिटी स्थापन करून लोकांचा सहभाग वाढवावा. आमची मदत घेऊन हे शहर स्मार्ट करा, अशा सूचना देशभरातून आलेल्या तज्ज्ञांनी केल्या. 

 

महापालिका व एमईसीसीच्या औरंगाबाद फर्स्ट संस्थेतर्फे शनिवारी एमजीएमच्या रुक्मिणी हॉलमध्ये 'स्मार्ट सिटीवर मंथन' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली, सुरत, अहमदाबादसह इतर शहरांतून आलेल्या तज्ज्ञांनी ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन, शहर विकास, गृहनिर्माण, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, तंत्रज्ञान, शिक्षण या विषयांवर अभ्यासपूर्ण मते मांडली. सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत विविध सत्रांमधून शहराच्या विकासासाठी काय करावे लागेल यावर चर्चा करण्यात आली. शहर स्मार्ट होण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मान्यवरांनी सांगितले. दुपारी एक वाजता महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन यांच्या उपस्थितीत औपचारिक उद््घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सुरू होणाऱ्या स्मार्ट सिटी बसचे डिझाइन तयार करणाऱ्या श्रीकांत मोरे यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर आयुक्त निपुण विनायक, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक भापकर, उद्योजक बी.एस. खोसे तसेच शहरातील प्रतिष्ठित उद्योजक उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या सहसचिव अंजू उप्पल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन हेमंत लांडगे यांनी केले. रात्री उशिरापर्यंत मनपाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. पदाधिकारी मात्र एका सत्राला थांबून निघून गेले. 

 

सोलार सिटी म्हणून सुरतची ओळख : सुरत महापालिकेचे जिग्नेश पटेल व जिगर पटेल यांनी एनर्जी व आयटीबाबत सादरीकरण केले. प्लेगमुळे बदनाम झालेले सुरत आता सोलार सिटी म्हणून नावारूपाला आले आहे. सोलार, सांडपाणी व पवन ऊर्जेतून महापालिका वीजनिर्मिती करते. पाच हजार घरांवर सोलार पॅनल आहेत, असे त्यांनी सांगितले. 

 

नळांना ताेट्या बसवा, २० टक्के पाणी वाचेल : शहराची जेवढी गरज आहे त्यापेक्षा निम्मेच पाणी मिळत आहे. त्यात अनेक भागांत चार-चार तास पाणी दिले जाते. या ठिकाणी नळांना केवळ तोट्या जरी बसवल्या तरी किमान १५ ते २० टक्के पाण्याची बचत होऊ शकते. पाणीपुरवठ्याला स्मार्ट पर्यायांची गरज आहे, असे मत राजेंद्र होलाणी यांनी व्यक्त केले. 

 

शहरात दिसेल २५ किलोमीटरची नदी : अतिक्रमणामुळे खाम नदीचा नाला झाला आहे. बायोसोर्सेसच्या माध्यमातून नदी स्वच्छ केल्यास २५ किलोमीटरची स्वच्छ नदी शहरातून वाहताना दिसेल. पाण्याचे होणारे प्रदूषण व गरज लक्षात घेता "वॉटर पॉलिसी'ची संकल्पना राबवणे गरजेचे असल्याचे प्रशांत देशपांडे म्हणाले. 

 

सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा : एमजीएम क्लीन इंडियाचे संचालक आर. आर. देशपांडे यांनी त्यांच्या संस्थेने केलेल्या कामांची माहिती देत सांडपाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. वृक्षारोपणाचे काम करणारे रवी चौधरी, कचऱ्यापासून ऊर्जा तयार करणारे यंत्र विकसित करणारे प्रियदर्शन, प्रेरणा बडजाते यांनी आपली मते मांडली. रणजित कक्कड यांनी आभार मानले. 

 

पदाधिकाऱ्यांनी काढले एकमेकांचे चिमटे, आयुक्तांवर मात्र सर्वांचा कौतुकाचा वर्षाव 
औरंगाबाद | मी कसे चांगले काम केले अन् दुसऱ्याने कसे वाईट केले याचे किस्से सांगत मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचे चिमटे काढले. दुसरीकडे आयुक्त डॉ. निपुण विनायक हे चांगले काम करत असल्याचे सांगत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. स्मार्ट सिटीतील रस्ते, वाहतूक व्यवस्था या विषयावरील सत्रात नगरसेविका अदवंत शहर बकाल झाल्याची टीका केली, तर जैन यांनी माइकचा ताबा घेत सर्वांचे आभार मानायचा धडाका सुरू केला. आयुक्तांचे आभार आणि कामांचे कौतुक करताना आयुक्तांनाही हसू आवरले नाही. मी महापौरांच्या अखत्यारीत काम करत असल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यानंतर महापौर घोडेले यांनी चौफेर फटकेबाजी करत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून देत शहराच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. 

 

मनपा, औरंगाबाद फर्स्टतर्फे 'स्मार्ट सिटीवर मंथन' कार्यशाळा 
कार्यशाळेत बोलताना महापौर नंदकुमार घोडेले. मंचावर आयुक्त डाॅ. निपुण विनायक, विकास जैन आदी. 


शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ११८ पैकी फक्त पाच नगरसेवकांची उपस्थिती 
शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमाकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली. ११८ पैकी फक्त महिला व बालकल्याण सभापती माधुरी अदवंत, नगरसेवक राजगौरव वानखेडे, सुरेखा सानप, दिलीप थोरात, राहुल सोनवणे हे ५ जण उपस्थित होते. महापौर, आयुक्त शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत असले तरी नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक याबाबत किती गंभीर आहेत, हे आज दिसून आले. 

 

शहर कसे असावे, तुम्हीच ठरवा 
या शहराचे आपण काही देणे लागतो या भूमिकेतून एमईसीसीतर्फे औरंगाबाद फर्स्ट ही संकल्पना पुढे आली. संस्थेतर्फे विविध विकासकामे सुरू आहेत. आपले शहर कसे असावे हे शहरातील नागरिकांनीच ठरवावे. -बी. एच. खोसे, औरंगाबाद फर्स्ट 

 

शहर विकासात सहभाग वाढवा 
रस्त्यावर साचलेला कचरा,अरुंद रस्ते आदी समस्यांसाठी मनपाला नावे ठेवली जातात. मात्र, रस्त्यावर कचरा फेकणारे, अतिक्रमण करणारे कोण आहेत? मनपाला नियोजन जमत नाही एवढाच त्यांचा दोष आहे. मात्र, शहराच्या विकासात आपला सहभाग किती आहे याचा विचार प्रत्येकाने करावा. -उल्हास गवळी, उद्योजक 

 

अनेक हात, संकल्पनांची गरज 
स्मार्ट सिटीची संकल्पना यशस्वी होण्यासाठी अनेक हातांची, संकल्पनांची गरज आहे. नागरिकांच्या सहभागासाठी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट कमिटी स्थापन करावी. देशभरातील शहरांचे अभ्यासपूर्ण सादरीकरण त्यांनी करावे. -कीर्ती शहा, वास्तुविशारद, अहमदाबाद 

 

मनपाने लोकांपर्यंत पोहोचावे 
या शहरात स्मार्ट लोकांची कमतरता नाही. एमजीएमसारखी संस्था, काही नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट काम केले आहे. लोक बदलण्यास तयार आहेत. मनपाने यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. -विनीत कुमार, घनकचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ, दिल्ली 

 

बातम्या आणखी आहेत...