Home | Maharashtra | Vidarva | Akola | Asif Khan massacre: Police custudy to former president of washim ZP Jyoti Ganeshpure with three

आसिफ खान हत्याकांड: वाशीम जि.प.च्या माजी अध्यक्षा ज्याेती गणेशपुरेसह तिघांना पाेलिस काेठडी

प्रतिनिधी | Update - Aug 22, 2018, 01:23 PM IST

भारिप- बमसंचे नेते आसिफ खान मुस्तफा खान यांना वाशीम जि. प.ची माजी अध्यक्षा ज्योती अनिल गणेशपुरे हिने १६ ऑगस्टला रात्री

 • Asif Khan massacre: Police custudy to former president of washim ZP Jyoti Ganeshpure with three

  अकोला- भारिप- बमसंचे नेते आसिफ खान मुस्तफा खान यांना वाशीम जि. प.ची माजी अध्यक्षा ज्योती अनिल गणेशपुरे हिने १६ ऑगस्टला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मुर्तिजापूरला बोलावले. तेथून त्यांना आमिष दाखवून अमरावती जिल्ह्यातील बहिणीच्या मुलाच्या गावी एरंडा आवला येथे नेले. तेथे ज्योती गणेशपुरेने तिच्या मुलांच्या मदतीने आसिफ खान यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह येथे पुर्णानदी काठावर आणून त्यांच्याच गाडीत बसवून नदीत सोडून अपघात भासवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात ते अपयशी ठरल्याने मृतदेह चादरीत बांधून पूर्णेच्या पुरात फेकला, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


  दरम्यान वडील आसिफ खान यांचे ज्योती गणेशपुरेंनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले, अशी तक्रार त्यांचा मुलगा डॉ. सोहेलखान यांनी बाळापूर पोलिसांत दिली होती. पोलिसांनी त्यावरून ज्योती गणेशपुरे, तिचा मुलगा वैभव स्वप्निल उर्फ गोलू वानखडेला अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आसिफ खान यांची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी ज्योती अनिल गणेशपुरे, मुलगा वैभव अनिल गणेशपुरे(वय १९), स्वप्निल ऊर्फ गोलू वानखडे(वय २१ रा. आमला जि. अमरावती), अशोक सावतकर, वारीसभाई व रामदास पखाडे तिघेही रा. काजळेश्वर जि. वाशीम यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. ज्योती गणेशपुरे, वैभव गणेशपुरे व स्वप्निल ऊर्फ गोलू वानखडेला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर अशोक सावतकर, वारीसभाई व रामदास पखाडे या फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेचा तपास पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे करीत आहेत.


  आरोपीच्या शोधात दोन पथक रवाना
  स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोधासाठी दोन पथके रवाना केले आहेत. मृतकाचा शोध घेण्यासाठी एक पथक मुक्ताईनगरला रवाना केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.


  जप्त कारमध्ये रक्ताचे डाग आरोपीचे
  आरोपी ज्योती गणेशपुरेसह सहाही आरोपींनी १६ ऑगस्टच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन गाड्याचा वापर केला. आसिफ खान यांच्यात गाडीत ते बसून म्हैसांगपर्यंत असून आल्याने त्यांच्या रक्ताचे डाग हे कारला लागले होते. रक्ताचे डागाचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत.


  मारण्यापूर्वी झटापटीत आरोपीला किरकोळ जखम
  आसिफ खान यांना गळा दाबून मारले. त्या वेळी त्यांनी प्रतिकार केला. यावेळी त्यांच्याजवळ छोटा चाकू होता. स्वत:चा बचावाचा त्यांनी प्रयत्न केला असता झटापटीत ज्योती गणेशपुरे व स्पप्नील यांच्या मानेला किरकोळ जखमा झाल्यात, अशी कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.


  पूर्णेचा पूर वाढल्याने शोधमोहिमेत अडचणी
  चौथ्या दिवशी आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी व संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाचे जवान मंगळवारी शोध घेत होते. मात्र पावसाने नदीचा पूर वाढत असल्याने शोध कार्यात अडचणी आल्या. नदी काठावर किंवा पात्रात मानवी मृतदेह दिसून आल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.


  वाद प्लॉटच्या खरेदी व्यवहाराचा
  ज्योती गणेशपुरे व आसिफ खान यांच्यात आर्थिक व्यवहार होते. त्यातून त्यांच्यात बिनसले. या वादातून त्यांचे संबंध ताणले गेले होते. एका प्लॉट खरेदीच्या वादातून त्यांच्यातील संबंध पराकोटीला गेल्याने आसिफ खान यांचा कायमचा काटा काढण्याचे ज्योती गणेशपुरे हिने ठरवल्याने हत्याकांड घडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Trending