आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा निवडणुकीचे कवित्व संपता संपेना; शिवसेनेच्या \'त्या\' नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा : छिंदम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून नवीन महापौर व उपमहापौरांच्या निवडीही झाल्या आहेत. तथापि, निवडणुकीचे कवित्व अजूनही संपता संपलेले नाही. भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना पक्षाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे प्रभाग ७ मध्ये इतर प्रभागातील सुमारे ४५० मतदार बीएलओंना हाताशी धरून समाविष्ट केले असल्याचा आरोप शिवसेनेचे पराभूत उमेदवार आकाश कातोरे यांनी केला आहे. याप्रकरणी या प्रभागातील २६ उमेदवारांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. 

 

महापालिकेची निवडणूक ९ डिसेंबरला झाल्यानंतर १० डिसेंबरला निकाल समोर आला. या निकालामुळे अनेक मातब्बरांना पराभव स्वीकारावा लागला, तर काही नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेपूर्वी शहराच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडून वेगळीच युती समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे प्रथमच महापौर व उपमहापौरपद भाजपला मिळाले आहे. पण या राजकीय समिकरणाचे पडसात राज्याच्या राजकारणावरही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी देखील या प्रकरणी गंभीर दखल घेत संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना याप्रकरणी नोटिसाही बजावण्यात आल्या असून एकत्रित खुलासा देण्याचीही तयारी नगरसेवकांकडून सुरू असल्याची माहिती समजली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन दिवसांत बैठक होणार असल्याने त्यात याबाबत खुलासा देण्याची शक्यता आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे, तर राष्ट्रवादीच्याच काही नगरसेवकांनी नोटीस आली नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केल्याची चर्चा आहे. परंतु, स्थानिक पातळीवरून याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. 


प्रभाग ७ मध्ये शिवसेनेचे पराभूत उमेदवार आकाश कातोरे यांनीही निकालानंतर न्यायालयात धाव घेतली आहे. प्रभाग ७ मध्ये शिवसेनेचे कातोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार वाकळे यांच्यात थेट लढत झाली होती. त्यात विजयी उमेदवार वाकळे यांना ४ हजार ८२२, तर पराभूत कातोरे यांना ४ हजार ७३८ मते मिळाली होती. कातोरे यांचा अवघ्या ८४ मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर कातोरे यांनी पराभव गैरप्रकारामुळे झाल्याचा आरोप केला होता. बीएलओंना हाताशी धरून दुसऱ्या प्रभागातील ४५० मतदारांची नावे प्रभाग ७ मध्ये समाविष्ट केल्याचा मुद्दा उपस्थित करून न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी २६ विजयी, तसेच पराभूत उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उमेदवारांना म्हणणे मांडण्यासाठी ११ जानेवारीची मुदत दिल्याचे कातोरे यांनी सांगितले. निवडणुकीनंतरही सुरू असलेल्या राजकीय घडामोडी अन् न्यायालयात धाव घेण्याच्या प्रकारामुळे निवडणूक गाजली आहे. 

 

माहिती मागवली 
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नोटिसा गेल्याचे समजते. परंतु, या नोटिसा माझ्यामार्फत दिल्या गेल्या नाहीत. तथापि, पक्षाकडून मला २९ तारखेचे पत्र प्राप्त असून मनपातील घडामोडीबाबत माहिती मागवली आहे.'' माणिक विधाते, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी. 

 

पराभवामुळेच आरोप 
हे जर मी केले असे विरोधक म्हणत असतील, तर चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून यायला हवे होते. पण राष्ट्रवादीचा एकच उमेदवार निवडून आला आहे. शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले. पराभव झाल्यामुळेच असे आरोप होत आहेत.'' कुमार वाकळे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस. 

 

शिवसेनेच्या 'त्या' नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा : छिंदम 
मनपा सभागृहात महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पीठासीन अधिकाऱ्यांसमोर मारहाण झाली. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रिया काही वेळ बंद पडली. मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीपाद छिंदमने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

 

छिंदमने म्हटले आहे, शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे, अमोल येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व इतर चाैघांनी मतदान करण्यापासून रोखत जीवघेणा हल्ला केला. संरक्षणासाठी मी पोलिस अंगरक्षकाची मागणी केली होती. त्याप्रमाणे अंगरक्षक मिळाले. मात्र, अंगरक्षक सभागृहाबाहेर थांबले होते. मी महापौरपदाकरिता मतदान केल्यावर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला करुन मारहाण केली. सभागृहात माझ्याजवळ जर अंगरक्षक असते, तर माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झाला नसता. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करावी. अशी मागणीही छिंदमने निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी. माझी त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, असेही छिंदमने निवेदनात म्हटले आहे

निवडणूक रद्द करावी 
महापालिकेच्या निवडमुकीत प्रभाग ७ मध्ये घडलेल्या गैरप्रकारामुळे मी पराभूत झालो आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी, अशी याचिकेद्वारे मागणी केली आहे. मतदारयादीत २५० दुबार नावे आहेत. बोगस मतदान झाल्याची शक्यता आहे. अॅड. नितीन आपटे, अॅड. अभजित लहारे व हेमंत पाटील न्यायालयात माझी बाजू मांडत आहेत.'' अक्षय कातोरे, शिवसेना.