आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटी बस चालवण्यासाठी मनपा-एसटी महामंडळात करार; दिवाळीपासून सेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात सुरू होणारी सिटी बस चालवण्यासाठी स्मार्ट सिटीची एसपीव्ही आणि एसटी महामंडळ यांच्यात नवरात्रीच्या पहिल्या माळेच्या मुहूर्तावर करारनामा करण्यात आला. परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी झाली. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल आणि स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 


बस खरेदी स्मार्ट सिटी योजनेतून महापालिका करेल आणि महामंडळ ते चालवेल, असा पाच वर्षांसाठी हा करार करण्यात आला. त्यानंतर पुढे करार सुरू ठेवायचा की महापालिकेने पर्यायी व्यवस्था करायची याचा निर्णय तत्कालीन प्रशासनाकडून घेतला जाईल. 


शहर बस सेवेला आतापर्यंत एक हजार कोटींचा तोटा

औरंगाबादेत १९९१ मध्ये शहर बससेवा सुरू करण्यात आली. काही काळ ती बंद होती. आजघडीला २४ बसेस सुरू आहेत. आतापर्यंत बससेवेला एक हजार १८७ कोटींचा तोटा झाल्याचे रावते यांनी आवर्जून सांगितले. दुसरीकडे आजघडीला राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या सिटी बस मिळून दरवर्षी १२४ कोटींचा तोटा होत आहे. असे असले तरी नव्या जोमाने सुरू होणारी शहर बससेवा मात्र फारशी तोट्यात चालणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


आदित्य ठाकरे, खैरेंना श्रेय 
या कराराचे श्रेय रावते यांनी सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे व खासदार चंद्रकांत खैरे यांना दिले. ते म्हणाले आदित्य यांनी महापालिकेला शब्द दिला होता, तर आधीपासून खैरे यासाठी पाठपुरावा करत होते. तोट्यात असतानाही खैरेंच्या आग्रहामुळे आम्ही ही सेवा सुरू ठेवल्याचे त्यांनी

सांगितले.

 

 

येथे असतील नियंत्रण कक्ष

नव्या शहर बस १२५ रस्त्यांवरून धावतील. त्यासाठी साडेचारशे कर्मचारी नियुक्त केले जातील. यात आगारप्रमुखांपासून ते चालक-वाहकांचा समावेश असेल. वाळूज, पंढरपूर, रेल्वेस्थानक, बाबा पेट्रोल पंप, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, हर्सूल, शहागंज आणि चिकलठाणा येथे नियंत्रण कक्ष असेल. 


कधी येणार बस हे समजेल थांब्यावर

येणारी बस आता कोणत्या ठिकाणी आहे हे बस थांब्यांवर डिस्प्ले होईल. बसला यायला नेमका किती वेळ आहे हेही प्रवाशांना समजू शकेल. बस थांबे उभारण्याची जबाबदारी महापालिकेची असेल. तेथे वायफाय झोन असेल. 


राज्यात असा प्रयोग पहिल्यांदाच

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीच तोट्यात राहते. महामंडळाच्या अनुभवाचा फायदा महापालिकेला व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. ही बस आपली आहे, या भावनेतून ती पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. एखादी महापालिका बस खरेदी करतेय आणि महामंडळ ती चालवते हे राज्यात प्रथमच होत आहे.

- दिवाकर रावते, परिवहनमंत्री. 


अशी असेल सवलत 
६७ % शालेय विद्यार्थी 
७५ % अंध व दिव्यांग 
५० % त्यांच्या-समवेत एक व्यक्ती 

बातम्या आणखी आहेत...