आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- १०० कोटींच्या रस्ते कामांचा शुभारंभ करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आणखी १२५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वीच हा निधी मिळावा, यासाठी पुढील आठवड्यात मनपा पदाधिकारी प्रस्ताव घेऊन मुंबईला जाणार आहेत, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. डिफर पेमेंटच्या कामांसाठी दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनपा तिजोरीतील खडखडाट पाहता शासन निधी वगळता अन्य कामांच्या निविदांना कंत्राटदारांनी हातही लावलेला नाही.
१०० कोटींबरोबरच ५० कोटींच्या डिफर्ड रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यास कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. डिसेंबरमध्ये प्रशासनाने २०१८-१९ च्या नवीन डीएसआर रेटनुसार पुन्हा निविदा प्रसिद्ध केल्या. त्यात एकाही ठेकेदाराने स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे आता पुन्हा निविदा काढावी लागणार आहे. यात ज्या वॉर्डातील कामे आहेत, ती कामे वगळून सव्वाशे कोटी रुपयांच्या यादीत घेण्याची मागणी नगरसेवक करत आहेत. मात्र महापौरांनी त्यास नकार दिला. रस्ते कामासाठी सुरुवातीला दीडशे कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली. पैकी १०० कोटी मिळाले. उर्वरित ५० कोटी रुपये मिळण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे. हा निधी मिळाल्यास डिफर पेमेंटची कामे यातून मार्गी लागणार असल्याचे मत घोडेले यांनी व्यक्त केले.
सोमवारी प्रसिद्ध होणार निविदा
पहिल्यांदा शंभर कोटी रस्त्यांच्या निविदांबरोबरच डिफर्डच्या डी-१ आणि डी-२ अशा दोन निविदा मागवल्या होत्या. एका निविदेला प्रतिसाद मिळाला. त्यात ३९ टक्के वाढीव दराने जीएनआयची निविदा प्राप्त झाली होती. वाटाघाटीअंती २० टक्के वाढीव दरात काम करण्यास कंत्राटदाराने नकार दिला. त्यानंतर नवीन डीएसआर रेटनुसार निविदा जारी करूनही त्यास शून्य प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा सोमवारी दीर्घ मुदतीची २५ दिवसांची निविदा प्रसिद्ध होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.