आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गतवर्षी ज्या 17 ठिकाणी झाला होता उद्रेक, यंदा तेथे सलाेख्याचे वातावरण!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कोरेगाव भीमा येथील घटनेचे गेल्या वर्षी शहरात १ जानेवारी २०१८ रोजी १७ ठिकाणी तीव्र पडसाद उमटले होते. यंदा पोलिसांनी सर्वच बाजूंनी खबरदारी घेतल्याने उद्रेक झालेल्या सर्व ठिकाणी मंगळवारी शौर्यदिनी सलाेख्याचे वातावरण हाेते. गतवर्षीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरू केली होती. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या सुमारे १०० तरुणांचे पोलिसांनी समुपदेशन केले. त्याशिवाय ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही महत्त्वाच्या दिवशी ३ हजार पोलिसांनी डोळ्यात तेल घालून अहोरात्र पहारा देत शहरातील वातावरण बिघडू दिले नाही. याबद्दल लाखो औरंगाबादकरांनी पोलिसांना धन्यवाद दिले. 

 

३ हजार पोलिस, २४ तास खडा पहारा : 
३१ डिसेंबरपासून ते १ जानेवारी सायंकाळपर्यंत सतत २४ तास शहरात गस्त घालण्यासाठी ८ पथके तयार करण्यात आली होती. १७ पोलिस ठाण्यांच्या २ मोबाइल- ३ मोबाइल ही पथके, बीट मार्शलही दिवसभर गस्तीवर होते. या पथकांनी विविध हॉटेल, ढाबे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मॉल, लॉज, गर्दीच्या ठिकाणी जाऊन संशयास्पद व्यक्ती, परदेशी नागरिकांची चौकशी केली. याशिवाय पोलिस आयुक्तालयात राज्य राखीव पोलिस दलासह शहर पोलिसांचा स्ट्रायकिंग फोर्स तयार दिवसभर तयार होता. सुमारे ३ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

 

१७ ठिकाणी गतवर्षी झाला होता उद्रेक : 
आंबेडकरनगर, एस. टी. कॉलनी, फाजलपुरा, समतानगर, गरम पाणी, शताब्दीनगर, सिद्धार्थनगर, कैलासनगर, इंदिरानगर, फुलेनगर, कबीरनगर, एकतानगर, क्रांतीनगर, राजीवनगर, साठेनगर भावसिंगपुरा, घाटी परिसर, संजयनगर, जय भवानी नगर, भोईवाडा आदी परिसरात मागच्या वर्षी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मंगळवारी या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. यातील बहुतांश ठिकाणी शौर्य दिनानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

 

४२ एसटी बसेसची सुखरूप पुणे वारी : 
मध्यवर्ती बसस्थानकातून रोज ४२ एसटी बसेस पुण्याला जातात. या बसेसना २ दिवस चाकणमार्गे वळवण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारीही प्रवाशांची पुणे वारी सुखरूपपणे पार पडली, तर कोरेगाव भीमा येथेही सुमारे सात हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामार्गे पुण्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना संगमनेरच्या दिशेने वळवण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
 
शाळा कोचिंग क्लासेसना सुटी : 
गतवर्षीचा अनुभव पाहता ,खासगी कोचिंग क्लासेसनी मंगळवारी सुटी दिली होती. काही इंजिनियरिंग कॉलेजच्या परीक्षा झाल्यामुळे त्यांना सुटी सुरु आहे. तर शाळा- महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी 'कॉमन ऑफ' घेतले.

 

ही खबरदारी घेतली 
गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवले. चिथावणीखोर, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या १०० तरुणांना पोलिस आयुक्तालयात बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. 

 

३१ डिसेंबरसाठीचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाच, शिवाय दुसऱ्या दिवशी त्यात वाढ करण्यात आली होती, अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली. 

 

नाक्यांवर कसून तपासणी 
७२ ठिकाणी शहरात फिक्स पॉइंट, ०६ अधिकारी चेकपोस्टवर तैनात, ४८ कर्मचाऱ्यांच्या ताफ्याकडून कडक तपासणी. हर्सूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी पॉइंट आणि वाळूज नाका या शहराच्या प्रवेशद्वारांजवळ पोलिस कर्मचारी व अधिकारी ये- जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत होते. 

 

गतवर्षी सोशल मीडियावरील अफवांमुळे बिघडले होते शहरातील वातावरण 
गतवर्षी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा ते पेरणे फाटा दरम्यान दगडफेक होताच शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. सोशल मीडियामुळे अफवांमध्ये भर पडली. उस्मानपुरा, क्रांती चौक, टाऊन हॉल, टी.व्ही.सेंटर चाैक, हडको परिसरासह एकूण १७ ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. घोषणा देत जमावाने दुकाने बंद पाडली. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही भागात दगडफेकही झाली होती. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी सुटीवर होते.परंतु पोलिस दलाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली होती.