आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्प्रिंग तुटली; गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - येथील रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी १०.२७ वाजता आलेल्या गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसच्या, इंजिनालगतच्या कोचखालील स्प्रिंग तुटल्याचा प्रकार रेल्वेच्या सीएनडब्ल्यू विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे संबंधित कोच (क्र.एनआर १६३४३०) वेगळा करून गाडी मुंबईकडे ११.५५ वाजता रवाना झाली. कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या, त्यामुळे संभाव्य अपघात टळला. या प्रकारामुळे गाडीला भुसावळात १ तास २८ मिनिटांचा विलंब झाला. 


खंडव्याकडून येणाऱ्या गाेरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसचे जंक्शनवर रविवारी सकाळी १०.२७ वाजता आगमन झाले. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफाॅर्म तीनवर गाडी येत असताना, इंजिनालगतच्या कोचखालील स्प्रिंग तुटल्याचे निदर्शनास आले. रूळांच्या बाजूला बसून डब्यांची पाहणी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार समजला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ वरीष्ठांना या घटनेची माहिती दिली. स्थानक संचालक अार.जी. अय्यर यांनीही तुटलेल्या स्प्रिंगची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली. इंजीनाजवळील पहिलाच जनरल डबा असल्याने त्याच प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे अारपीएफच्या मदतीने डब्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्प्रिंग तुटलेला डबा गाडीपासून वेगळा करण्याचा निर्णय घेतला. 

 

प्रशस्तीपत्राने गौरव होणार 
सीएनडब्ल्यू विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला. त्यामुळे डीआरएम अार.के.यादव यांच्यासह अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच लवकरच या कर्मचाऱ्यांचा रेल्वे प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. कार्यतत्पर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. 

 

कर्मचाऱ्यांचे काैतुक 
प्रत्येक रेल्वे गाडी स्थानकावर येत असताना त्या गाडीची बारकाईने तपासणी केली जाते. रविवारीदेखील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे स्प्रिंग तुटल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे माेठा अपघात टळल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची रेल्वे प्रशासनातर्फे दखल घेतली जाईल.

जी.अार.अय्यर, रेल्वे स्थानक संचालक, भुसावळ 

 

गाेरखपूर एलटीटी एकस्प्रेसची तुटलेला स्प्रिंग 
स्प्रिंग तुटल्याने डबा पुढे नेता येणार नसल्याने हा डबा काढून घेण्यात आला. त्यामुळे या डब्यातील प्रवाश्यांना गाडीच्या मागील दुसऱ्या जनरल डब्यात बसवण्यात आले. त्यामुळे आधीच गर्दीने खच्चून भरलेल्या डब्यात प्रवाशांची दाटीवाटी झाली. डबा वेगळा केल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. 

 

संभाव्य धोका टळला 
स्प्रिंग तुटलेल्या अवस्थेत गाडी पुढे गेली असती तर प्रवासात डब्याला झटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे वेळप्रसंगी डबा रूळावरून खाली उतरून माेठा अपघात झाला असता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे स्प्रिंग तुटलेला डबा वेळीच वेगळा करण्यात अाला. 

बातम्या आणखी आहेत...