आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोमेट्रिक हजेरी अहवालानंतरच कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासह २०१८ व २०१९ या शैक्षणिक वर्षातील दाखल्यांची पडताळणी करण्यासाठी शनिवारी दि. १७ रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे रमाबाई आंबेडकर विद्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शिबिराकडे शहरातील महाविद्यालयातील प्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे संचमान्यतेसाठी आवश्यक असलेली कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही. 

 

कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक यंत्रणेवर विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या हजेरीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. २६ नोव्हेंबरपर्यंत शहरातील विज्ञान शाखेच्या सर्व महाविद्यालयांना हजेरी अहवाल सादर करावा लागेल. त्यानंतरच संचमान्यतेची कार्यवाही होणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ठ करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांनी बायोमेट्रिक यंत्रणा बसवली नसेल त्या महाविद्यालयांची संचमान्यता रखडण्याची चिन्हे आहे. 

 

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शनिवारी दि. १७ रोजी रमाबाई आंबेडकर विद्यालयात सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत कनिष्ठ महाविद्यालयांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शिबिरात शहरातील महाविद्यालयांनी सहभाग घेतला नाही. महाविद्यालयांनी पाठ फिरवल्याने या शिबिरात कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही. या शिबिरात जनरल रजिस्टर, दाखले फाइल करणे, सरल डाटा प्रिंट (विद्यार्थी नोंदणी), बायोमेट्रिक हजेरी अहवाल तसेच प्रपत्र अ, ब, क यामध्ये माहिती नोंदवून सदर शिबिरात सादर करावयाची होती. यानंतरच संबंधित महाविद्यालयांना शिक्षण विभागातर्फे संचमान्यता मिळणार आहे. परंतु, या शिबिराकडे महाविद्यालयांनी पाठ फिरवल्याने सदरची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तसेच आता बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल सादर करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर ज्या महाविद्यालयांची हजेरी अहवाल असेल त्यांनाच संच मान्यता मिळेल. बायोमेट्रिक नसलेल्या महाविद्यालयांची संच मान्यता केली जाणार असल्याचेही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्यांच्यावर शासन परिपत्रकाप्रमाणे पुढील कारवाई केली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...