आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थ्यांची गर्दी, तक्रारींचा पाढा वाचल्याने आयोजकांचीच गोची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यातील साडेतीन शक्तिपीठे आणि इतिहासकालीन स्त्रियांच्या जन्मस्थानांची प्रेरणापीठे असा २५ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या नवरात्रोत्सव यात्रेला बुधवारी नाशिक जिल्ह्यातून सुरुवात झाली. मात्र, देवळ्यातील महिला मेळावा संपल्यानंतर पहिल्याच माळेला सरकारी योजनांची प्रसिद्धी केल्यानंतर या योजनाच काही लाभार्थ्यांपर्यंत न पोहाेचल्याने त्यांनी व्यासपीठाजवळ येऊन गर्दी केली व तक्रारींचा पाढा वाचल्याने आयोजकांचीच मोठी गोची झाली. 


'पहिली माळ भूमातेला, शेतकऱ्यांच्या सन्मानाची' या भूमिकेतून देवळा येथे शेतकरी महिलांच्या मेळाव्याने यात्रेची सुरुवात होणार होती. प्रत्यक्षात गिरजा मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यातील मुख्य फलक महिला आयोगाचा लावण्यात आला होता. सभागृहात जमवलेल्या महिलांमध्ये शेतकरी कमी आणि बचतगटाच्या सदस्या अधिक असेच चित्र होते. मेळावा सुरू झाल्यावर 'नवरात्रोत्सव २०१८'चा अर्धवट फलक आणून मेळाव्यास्थळी उभारण्यात आला. काही शेतकरी महिलांचे सत्कार एवढाच मूळ नियोजनातील भाग यावेळी प्रत्यक्षात दिसला. बाकी पंतप्रधान 


नरेंद्र मोदींचा फ्लॅगशिप प्रोग्राम ठरलेल्या उज्ज्वला योजनेच्या प्रातिनिधिक लाभार्थींना गॅस शेगड्यांचे वाटप करून या मेळाव्याची सांगता झाली. मेळावा संपल्यावर शासनाच्या योजनांचा लाभ झालेल्या महिलांनी व्यासपीठाजवळ येण्याची उद;्घोषणा झाल्यावर, प्रत्यक्षात अर्ज केले, पण घरकुल मिळाले नाही, अर्ज केला पण गॅस कनेक्श्न मिळाले नाही, कनेक्श्न मिळाले, पण दोन वर्षांपासून संपलेला सिलिंडर भरण्यासाठी पैसे नाहीत या तक्रारी घेऊन महिलांनी गर्दी केल्याने आयोजकांची अडचण झाली. 


नाशिक शहर पदाधिकाऱ्यांची पाठ 
मेळाव्याला नाशिक शहर भाजपचे एक माजी शहराध्यक्ष वगळता बाकी पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने महिलांबद्दलचा दुजाभाव ऐन नवरात्रीतच उघड झाला. देवळा तालुक्यातील महिला मेळाव्यात स्थानिक आमदार डॉ. राहुल आहेर आणि खासदार डॉ. हरिश्चंद्र चव्हाण यांनी हजेरी लावली. मात्र, मूळ यात्रेचे स्वरूप आणि प्रत्यक्ष झालेला कार्यक्रम यातील विरोधाभासामुळे तेथील विसंवादही उघड झाला. 


मुंबईच्या बैठकीमुळे अनुपस्थिती : सानप 
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही राज्यव्यापी नवरात्रोत्सव यात्रा मंगळवारी संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाली. यात महिला मोर्चाच्या राज्यातील २१ पदाधिकारी सहभागी आहेत. बुधवारी ग्रामदेवता कालिकामातेचे दर्शन घेऊन ही यात्रा नाशिकहून पुढे निघाली. मात्र, नाशिक मुक्कामी माजी शहराध्यक्ष वगळता विद्यमान एकाही पदाधिकाऱ्याने यावेळी हजेरी लावली नाही. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे या अनुपस्थितीची चौकशी केली असता, मुंबईतील बैठकीमुळे आपण उपस्थित राहू शकले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिले. 


चूलच वापरते कारण सिलिंडरसाठी पैसे नाहीत 
उज्ज्वला योजनेखाली मला गॅस कनेक्शन मिळालं. पण दोन वर्षांपासून चूलच वापरते. कारण सिलिंडर भरण्यासाठी ८०० रुपये नाहीत. 
- सुनंदा गांगुर्डे 

 

अनेक दिवसांची मागणी, पण घरकुल मिळत नाही 
तहसीलदार कार्यालयाच्या बांधकामावेळी आमचे घर गेेले. तेव्हापासून आमची घरकुलाची मागणी आहे, पण मिळत नाही. 
- सरिता मोहन 

बातम्या आणखी आहेत...