आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षप्रमुखांचा नारा स्वबळाचा; भाजप, शिवसेना नेत्यांना मात्र आशा युतीची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला उद्देशून केलेल्या 'पटक देंगे' या विधानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजपमधील संबंधात आलेल्या तणावानंतर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यावर कुणीही भाष्य केले नसले तरीही बैठकीनंतर माध्यमांशी बाेलताना शिवसेनेच्या रामदास कदम यांनी 'पटकनेवालाें काे हम गाड देंगे' अशी आव्हानाची भाषा केली. तर, युतीची चर्चा अद्याप थांबली नसून भाजप युतीबाबत अद्यापही आशावादी असल्याचे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

 

पटकनेवालों को गाड देंगे 
आता दाेन्ही पक्षांमधील मैत्रीचे संबंध आणि जिव्हाळा संपले आहे. अमित शहांनी आम्हाला पटक देंगे असे म्हटले तरी आम्ही पटकनेवालाेंकाे हम पटक पटक के गाड देंगे.' निवडणुकीत मतदार हे दाखवून देईल. - रामदास कदम, पर्यावरण मंत्री 

 

युतीसाठी आम्ही अजूनही आशावादी 
शिवसेनेसाेबतच्या युतीची चर्चा थांबलीच नसल्याने पुन्हा सुरू झाली आहे, का हा प्रश्नच गैरलागू आहे. शिवसेनेशी युतीबाबत आपण अजूनही आशावादी आहोत. साेबत आले तर एकत्रित अन्यथा स्वबळावर निवडणुकीची भाजपची तयारी आहे. - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री 

 

आघाडीला दूर ठेवायचे असेल तर युती हवीच 
शिवसेनेच्या आमदार खासदारांनाही युती हवी. मंगळवारीच मला शिवसेनेचे काही आमदार भेटले आणि त्यांनीही युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर युतीशिवाय पर्याय नाही. - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री 

 

आढळरावांसह शिवसेनेच्या काही खासदारांना हवीय भाजपची साथ 
भाजपाध्यक्ष अमित शहांनी लातूरमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही 'आम्ही त्यांच्याकडे (भाजपकडे) ढुंकूनही पाहत नाही' अशी प्रतिक्रिया देत युती हाेणारच नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर 'दिव्य मराठी'ने शिवसेनेतील खासदारांची मते जाणून घेतली. खासदार आढळराव पाटील यांनी भाजपशी युती हवी, असे जाहीर मत मांडले. इतर खासदारांनी मात्र खासगीतआढळरावांच्या भूमिकेचे समर्थन केले. भाजप खासदारही शिवसेनेची साेबत हवी असल्याचे खासगीत सांगत असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. 

 

शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, 'दोन्ही पक्षांचे नेते युतीबाबत जाे निर्णय घेतील त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. परंतु युती व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. युती झाली तर दोघांचाही फायदा होणार आहे.' अमरावतीचे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, 'आम्ही कट्टर शिवसैनिक असून पक्षप्रमुख जो आदेश देतील त्यानुसारच काम करणार आहोत. पक्षप्रमुखांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याने युतीचा विषयच संपला आहे.' 

 

मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, 'केवळ शिवसेनेचेच नव्हे तर भाजपचेही खासदार युती व्हावी, असे बोलत आहेत. मात्र, आमच्यात कोणतीही बोलणी झालेली नाही. सगळ्यांना वाटते की युती झाली तर दोन्ही पक्षांना फायदा होईल. खासदार एकत्र भेटतात तेव्हा अशी अंतर्गत चर्चा होते. परंतु याचा अर्थ हा पक्षाचा निर्णय आहे, असे होत नाही. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्यानुसार आम्हाला काम करायचे आहे', असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राऊतांची भूमिका ताठरच; स्वबळाचा निर्णय आधीच घेतलाय, त्यात बदल नाही 
खासदार संजय राऊत म्हणाले, २०१७ ला शिवसेनेने स्वबळाचा ठराव केला. २०१४ ला आम्ही नव्हे तर भाजपने युती तोडली होती. मग, तेव्हा अमित शहा भाजप भाजप नेत्यांना युती तोडू नका, असे का म्हणाले नाहीत? आम्ही स्वबळावरच लढणार. पटकण्याची भाषा करणारे युतीसाठी आमच्या मागे का लागलेत? आम्ही नाही म्हणत असतानाही 'आमच्या प्रेमात पडा, लग्न करा', असे का म्हणत आहेत?' 

बातम्या आणखी आहेत...