आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मतः अंध तरुण पोवाड्यांतून दाखवतोय अंधश्रद्धेत बरबटलेल्या समाजाला फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची प्रकाशमान वाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औराळा - अंधत्वामुळे जग कसे दिसते हे पाहता येत नसले तरी तरी त्यामुळे खचून न जाता अंगी असलेल्या सुप्त कलागुणांच्या काैशल्याची चुणूक दाखवत तो अंधश्रद्धेत बरबटलेल्या समाजासाठी "वाटाड्या' ठरला. आपल्या पहाडी आवाजाला सप्तसुरांची जाेड देत त्याने सात वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांचे विचार समाजात पेरण्याचा वारसा घेतला आहे. या महापुरुषांच्या जीवन चरित्रावरील पाेवाडे, अभंग, गाैळणी, भावगीत, देशभक्तीपर आणि लोकगीते गाऊन तो अविरतपणे समाज प्रबोधन करीत आहे.

 

रामेश्वर अप्पा वाघचौरे असे या वाटाड्या तरुणाचे नाव. आपल्या पहाडी आवाजाने त्याने समाजमन काबीज केले आहे. तो स्वत: डफ, नाल, हार्मोनियम, पखवाज अशी वाद्येही वाजवतो. दाेन्ही डाेळ्यांनी अंध असलेला शिवशाहीर रामेश्वर वाघचाैरे गेल्या सात वर्षांपासून निःस्वार्थीपणे समाज प्रबोधन करत आहे. कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला रामेश्वर जन्मतः: दाेन्ही डाेळ्यांनी अंध आहे. वाघचाैरे कुटुंबावर रामेश्वरच्या संगाेपनाची माेठी जबाबदारी वाढली हाेती. रामेश्वर पाच वर्षांचा झाल्यानंतर त्याला औरंगाबाद येथील तारामती बाफना अंध विद्यालयात प्रवेश दिला गेला. चाैथीला असतानाच रामेश्वरने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे पुस्तक नुसते एेकूनच मुखोदगत केले हाेते. इतिहासातील प्रसंगांवर तो स्वत:च रचना करत त्या गुणगुणत होता. त्यांच्या सुंदर पहाडी आवाजाची शाळेतील शिक्षक आणि वर्गमित्रांनाही जणू भुरळ पडली होती. शिक्षकांनी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पाेवाड्याच्या काही कॅसेट मागवून त्या रामेश्वरला एेकवल्या. अन् दुसऱ्याच दिवशी वर्गात रामेश्वरने शिवाजी महाराजांचा पाेवाडा गाऊन दाखवला. सर्वांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला. तेथूनच पुढे रामेश्वरला गायन, वादनाची प्रचंड आसक्ती निर्माण झाली. 

 

शाहीर सुरेश जाधवांकडे गिरवले धडे : रामेश्वरने तीन वर्षे शिवशाहीर सुरेश जाधव यांच्याकडे पाेवाड्याचे धडे गिरवले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या जीवनावर तो पाेवाड्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकत राहिला. आता तर तो अविरतपणे समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहे. संत तुकाेबारायांच्या गाथेतील २०० पेक्षा अधिक अभंग, गाैळण, भारुडे त्याला मुखोदगत आहेत. भागवत गीतेचा बारावा व पंधरावा अध्यायही रामेश्वरला पाठ आहे. 

 

पुरस्कारांमुळे मिळाली स्फूर्ती 

रत्नागिरी येथे अंध समाज कल्याण विभागातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत रामेश्वरने पहिला क्रमांक पटकावला. औरंगाबादच्या आशादीप दिव्यांग प्रतिष्ठान या संस्थेतर्फे २०१८ च्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्याला सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमुळे तर त्याला आणखीच ऊर्जा आणि स्फूर्ती मिळाली आहे. 


अंधांसाठी स्वतंत्र महोत्सवाची गरज 
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्यासारखा नामवंत शिवशाहीर हाेण्याची इच्छा आहे. त्यासाठी दरराेज पहाटे रियाज करत आहे. शासनाने आम्हा अंध कलावंतासाठी स्वतंत्र महाेत्सवाचे आयाेजन करावे. शिवशाहीर रामेश्वर वाघचाैरे, धनगरवाडी 

बातम्या आणखी आहेत...