आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीठ चाखले नाही, अग्नी कसा पेटवायचा तेही माहीत नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -   अंदमान-निकोबार बेटावरील सेंटिनल आदिवासी जमात एका अमेरिकी पर्यटकाच्या हत्या प्रकरणावरून चर्चेत आहे. ही जमात हजारो वर्षांपासून जगापासून तुटलेली आहे. कारण तिला सामान्य माणसांच्या आजारांपासून दूर राहण्याची इच्छा आहे. त्यांना मुख्य प्रवाहात जोडण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पण भारताचे मानववंशशास्त्रज्ञ त्रिलोकनाथ पंडित (टी. एन. पंडित) हे एकमेव अशी व्यक्ती आहेत, ज्यांना या जमातीशी मैत्रीपूर्ण संबंध बनवण्यात यश मिळाले आहे. १९६६ ते १९९१ दरम्यान त्यांनी अशा बेटांचे अनेक दौरे केले होते. टी. एन. पंडित (८५ वर्षे) यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी ‘दिव्य मराठी’ला या जमातींसोबतचे अनुभव सांगितले.  


टी. एन. पंडित यांनी सांगितले की, ही जमात एवढी हिंसक आणि उग्र कधीच नव्हती. ती हिंसक होण्याचे कारण इतिहासात दडलेले आहे. १८५८ मध्ये इंग्रजांनी या जमातीला लक्ष्य केले होते. त्यांनीही तेव्हा धनुष्यबाणांनी मुकाबला केला होता. अर्थात काही दिवसांनंतर इंग्रज तर निघून गेले, पण आजार मागे सोडून गेले. त्यामुळे जमातीतील अनेकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून सामान्य जगातील लोकांपासून दूर राहावे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनी सेंटिनल बेटाच्या आपल्या दौऱ्याबाबत सांगितले की, जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला आपल्या जमिनीवर पायही ठेवू दिला नाही. त्यांनी आम्हाला पाण्यात उतरवून नारळ घेतले आणि जाण्यास सांगितले.  


राहणीमान असे आहे खाद्यसंस्कृती : टी. एन. पंडित यांनी सांगितले की, सेंंटिनल्स ना शेती करतात ना जनावरे पाळतात. ते फळे, मध, कंदमुळे, डुकरे, कासवे, मासे खातात. त्यांनी आतापर्यंत मीठ आणि साखरेचा स्वादही घेतला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना अग्नी पेटवताही येत नाही. वादळ किंवा पावसापासून अग्नीला वाचवतात. काही कारणामुळे अग्नी विझला तर दुसऱ्या जमातीकडून आग घेऊन येतात.  


समाज : टी. एन. सांगतात की, त्यांच्या समूहाचा कोणी प्रमुख नसतो. पण बाण, भाला, टोपले, झोपडे बनवणाऱ्यांना सन्मान दिला जातो. या बेटांवरील जमातीचे लोक जवळच्या नात्यांत लग्न करत नाहीत.  


कुटुंब : मुलांच्या पालनपोषणाबाबत पंडित सांगतात की, जेव्हा मुले आपल्या पायांवर उभी राहतात तेव्हापासूनच त्यांना धनुष्यबाण बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मोठेपणी कुशल व्हावे आणि सन्मान मिळावा हा हेतू.

 
प्रथा : टी. एन. म्हणतात की, या जमातीत एखाद्याचा मृत्यू झोपडीत झाला तर त्या झोपडीत कोणी राहत नाही. झोपडीच्या जागेवर त्या मृताचे दफन करतात आणि राहण्यासाठी दुसरी झोपडी बनवतात. आजारी पडल्यास फक्त जडी-बुटी आणि पूजा-पाठाचा आश्रय घेतात. ही जमात भूत-प्रेतांनाही खूप मानते. त्यांच्या मते भुते चांगली आणि वाईट असतात. ते त्यांचीच पूजा करतात. 

 

अमेरिकी नागरिकाचा मृतदेह असा मिळेल  
सेंटिनल जमातीचे लोक असे मानतात की बाहेरील लोक येथे फक्त आधिपत्य करण्यासाठी येतात. सरकार आणि प्रशासनाला अमेरिकी नागरिकाचा मृतदेह हवा असेल तर त्यांच्यावर बलप्रयोग करू नये, याकडे लक्ष ठेवावे लागेल. आधी एका चमूूने प्रायोगिक तत्त्वावर तेथे जावे आणि त्यांना विश्वासात घ्यावे. त्यानंतरच पूर्ण तयारी करून प्रशासनाने मृतदेह आणायला जावे. 

 

बातम्या आणखी आहेत...