आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावर संशय, पत्नीचा खून; मुलीच्या साक्षीमुळे बापाला जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आष्टी शहरात २०१७ मध्ये घडली होती. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या १४ वर्षीय मुलीने वडिलांविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. तिच्या साक्षीवरून आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. रवींद्र हुद्दार यांनी सोमवारी हा निकाल सुनावला. संतोष प्रल्हाद कदम (वय ४० रा. गाेंधळी गल्ली, आष्टी) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.


संतोष कदम हा सतत पत्नी सविता ऊर्फ सुनीताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरुन दोघांत सातत्याने वादही होत असत. १२ ऑगस्ट २०१७ रोजी रात्री दोघांमध्ये याच कारणावरुन वाद झाला होता. यावरून पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान संतोषने पत्नी सविता ऊर्फ सुनीताच्या डोक्यात पाटा घातला. यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, ही सगळी घटना १४ वर्षीय मुलगी प्रीती हिने बघितली होती. त्यामुळे या प्रकरणात ती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. शिवाय, संतोषचा भाऊ महेश व आई सुमन यांनीही पाट्याचा आवाज ऐकून वरच्या मजल्यावर धाव घेतली होती. त्यांनाही सुनीता मृत अवस्थेत दिसून आली तर संतोषही तिथेच उभा होता. या प्रकरणी आष्टी पोलिसांत महेश प्रल्हाद कदम या संतोषच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून संतोषवर खुनाचा गुन्हा नोेंद करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे ४ थे न्या. आर.व्ही. हुद्दार यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील बी. एस. राख यांनी केलेला युक्तिवाद, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, समोर आलेले पुरावे, वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून न्या. हुद्दार यांनी संतोष कदम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  


११ जणांची साक्ष  
या प्रकरणात मुलगी प्रीती, आई सुमन, भाऊ महेश यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी व सरकारी पंच आणि अन्य अशा ११ जणांची साक्ष सरकारी पक्षाच्या वतीने नोंदवण्यात आली. 

 

कुटुंबीयांनीच दिले ताब्यात  
संतोष हा पत्नीसह वरच्या मजल्यावर राहत होता तर खालच्या मजल्यावर आई भाऊ राहत होते. संतोषला वरच्या मजल्यावर पाटा नेताना त्याच्या आईने पाहिले होते. पत्नीच्या डोक्यात पहाटे अडीचच्या वेळी पाटा घातल्यानंतर त्याचा मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून खालच्या मजल्यावरील सुमन व महेश यांनी संतोषच्या रुमकडे धाव घेतली. त्याने पत्नीचा खून केल्याचे लक्षात येताच त्याला पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...