आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निविदेचे काम पाहणाऱ्या लिपिकाची बदली, पदभार न देताच विदेशवारीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर - सिंचन विभागातील घोटाळ्यात निविदा प्रक्रिया ही महत्त्वाची बाब राहिली आहे. हा टेबल नऊ वर्षे एकाच लिपिकाकडे होता. 'दिव्य मराठी'तून सिंचन घोटाळ्याला वाचा फुटल्यावर त्या लिपिकाची बदली करण्यात आली. मात्र, लिपिकाने बदलून आलेल्या कर्मचाऱ्याकडे अद्याप पदभार दिला नाही. उलट पदभार न देताच विदेशवारीवर निघून गेला. विशेष म्हणजे लिपिकाने यासाठी परवानगी घेतली नाही. 


सिंचन घोटाळ्यात निविदा प्रक्रिया पाहणाऱ्या लिपिकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. लघुसिंचन खात्यातील ठेकेदारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्याच मर्जीतील कर्मचारी त्या पदावर असावा याची पूरेपूर काळजी घेतली आहे. अभियंता सुजित कोरे यांच्याप्रमाणेच बदलीचे सारे निकष पायदळी तुडवत गेली नऊ वर्षे एकाच कर्मचाऱ्याने तेथे ठाण मांडले होते. सरकार निविदेसाठी ऑनलाइन पद्धती वापरते. मात्र, त्यातील त्रुटींचा फायदा घेत विशिष्ट ठेकेदारांना कामे दिली जातात.
 
'दिव्य मराठी'मधून सिंचन घोटाळ्याबाबत वृत्त मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाईचा आव आणत संबंधित लिपिकाची बदली केली. परंतु लिपिकाने बदलीनंतर नव्या कर्मचाऱ्याकडे पदभार सोपवण्याऐवजी विदेश वारीवर जाणे पसंत केले. काही ठेकेदार व सिंचन विभागाच्या 'अर्थ' विभागातील चार कर्मचारी परदेश वारीवर गेल्याची माहिती मिळाली आहे. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर नेहमीप्रमाणे पाहतो, बघतो अशी उत्तरे मिळाली. 

 

कार्यकारी अभियंता सी. ए. कदम यांनी दिलेली उत्तरे 
प्रश्न : निविदा लिपिकाची बदली केली. त्यांनी नव्या लिपिकाला पदभार दिला का? उत्तर : निविदा प्रणालीविषयी तक्रारी होत्या. त्यामुळे बदली केली. पण संगणकीय प्रणालीमुळे संपूर्ण पदभार घेता आला नाही. 


प्रश्न : एकाच कर्मचाऱ्याकडे नऊ वर्षे निविदेचे काम कसे. त्या लिपिकासाठी बदलीचे नियम नाहीत का? उत्तर : पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी का बदली केली नाही, याचे उत्तर मी देऊ शकत नाही. 
प्रश्न : कर्मचाऱ्यांनी परदेशात जाण्यासाठी आपली परवानगी घेतली का ? उत्तर : त्यांनी त्यासाठी परवानगी मागणारा अर्ज केला होता. मंजुरीसाठी पुण्याच्या कार्यालयाला पाठवला. पण अद्याप मंजुरी मिळाली नाही. 
प्रश्न : परवानगी मिळाली नसताना ते परदेशात गेले. त्यांनी शासनाच्या सेवा-शर्तीचा भंग केला. आपण कारवाई करणार का ? वरिष्ठ कार्यालयाला कळवणार का? उत्तर : मौन 

 

तृतीय श्रेणीतील कर्मचारी गिरवताहेत वरिष्ठांचा कित्ता 
सोलापूर सिंचन विभागातील या घोटाळ्याविषयी पुणे मंडलाचे मुख्य अभियंता एन. बी. कुसेरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दुबईला गेल्याची माहिती मिळाली. सिंचन विभागातील बडे अधिकारी सतत परदेश वारीवर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचाच कित्ता आता विभागातील तृतीय श्रेणीतील कर्मचारीही गिरवत आहेत. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...