आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुलामुळे कुणाला मिळाले छप्पर; तर कुणाच्या मुलीचे बाळंतपण झाले सुखरूप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नाशिक- 'नमस्कार मी नंदा लक्ष्मण पाडेकर. नाशिक तालुक्यातील महिरावणी गावची रहिवासी. मला पंतप्रधान अावास याेजनेतून घरकुल मिळाले, खूप आनंद झाला...' नाशिक जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी महिलेचा आनंद मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधताना ओसंडून वाहत हाेता. 'साहेब, पूर्वी माझे घर विटा, मातीत होते. पावसाळ्यात ओल यायची. मुले, सासू-सासऱ्यांना त्रास व्हायचा. वाऱ्या-वादळाने पत्रेही उडून जात. आता घरकुल मिळाल्याने आम्ही सुरक्षित झालाे...' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. नंदा यांच्या घराजवळच व्हिडिओ काॅन्फरन्सिंगची साेय करण्यात आली हाेती. याद्वारे त्यांचे घर पाहून मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. रंगही छान दिलाय.. असे म्हटले. तेव्हा नंंदा म्हणाल्या, 'हो, मला आकाशी रंग आवडतो. मी स्वत:च पेंट केलं आहे.....' 

 

राज्यातील पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या लाभार्थींशी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी व्हीसीद्वारे संवाद साधला. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून या लाभार्थींनी म्हणणे मांडले. याेजनेचे अनुदान थेट बँकेतून मिळत असल्यामुळे समाधानही व्यक्त केले. वर्ध्यातील सविता श्रीशैल गायकवाड या घरकाम करणाऱ्या महिलेने योजनेमुळे आपले घर झाल्याचे सांगून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

 

- वर्धा जिल्ह्यातील सुनंदा चौधरी म्हणाल्या, ' पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेतून जागा घेता आली, घरकुल याेजनेतून घराचे बांधकाम झाले.' 

- नांदेड जिल्ह्यातील लहान (ता. अर्धापूर) गावच्या अस्मिता वाहेवळ म्हणाल्या, 'पूर्वी अामचे कुडाचे घर हाेते. इतरांचे घर पाहून मुले म्हणायचे आपले घर कधी असे कधी हाेणार? चांगले घर व्हावे यासाठी मुले जोमाने अभ्यासाला लागली. त्यातच घरकुल याेजनेत घर मंजूर झाले,' असे त्यांनी आनंदाने सांगितले. 

- नांदेड जिल्ह्यातील सुजाता दिगंबर सावंत यांनी रमाई आवास योजनेतून घर मिळाल्यामुळे मुले आनंदी असून ती आपल्या मित्र-मैत्रिणींना घरी आवर्जून आणत असल्याचे सांगितले. 

- ठाणे जिल्ह्यातील दहिवलीचे कैलास धुळे, लातूरमधील बाबूराव साधू कांबळे, नागपूर जिल्ह्यातील खैरी पिंजेवाड येथील दर्शना सोलंकी, नाशिकमधील नंदा पाडेकर या लाभार्थींशी त्यांच्या नव्या घराच्या ठिकाणी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. 

 

'देवेंद्रच्या रूपात देवच भेटला : ज्याेत्स्ना : 
इचलकरंजी येथील ज्योत्स्ना दशरथ घोडके म्हणाल्या, माझे कच्चे घर होते. मात्र, घराची पडझड झाली होती. त्याच वेळी मुलीचे बाळंतपण आले होते. त्या विवंचनेत असतानाच घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाल्याचा निरोप अधिकाऱ्यांनी दिला अन् 'देवेंद्रच्या रूपात देव' भेटल्याचा आनंद झाला. घराचे बांधकाम झाल्यामुळे मुलीचे बाळंतपणाचे दिवस सुखरूप गेले.' 

 

स्वत:च्या नावाची पाटी बदलून नाव दिले 'देवेंद्र-माेदीजी' कृपा : 
कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात पांडुरंग निकम यांनी सांगितले, 'पक्के घर बांधल्यामुळे आनंद झाला. माझ्या मित्रांनी या घरावर कृ.पा. निकम या नावाच्या पाटी लावली हाेती. मात्र त्यात मी बदल करून 'देवेंद्र मोदीजी कृपा' असा बोर्ड लावला असल्याचे ते म्हणाले. 

 

साहेब, तुम्ही आमच्या नव्या घरात या : 
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विष्णू राऊत यांनी सरकारमुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याच्या भावना व्यक्त करून आपल्या नव्या घरात भेट देण्याचे थेट निमंत्रणच मुख्यमंत्र्यांना दिले. 

 

राज्यात १२ लाख घरकुले 
मुख्यमंत्री म्हणाले, 'पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत राज्यात १२ लाख घरांची निर्मिती करण्याचे नियोजन केले असून ६ लाख घरांचे काम सुरू आहे. पुढील वर्षी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील एकही गरजू कुटुंब घराविना राहणार नाही. गेल्या चार वर्षांत देशात सव्वा कोटी घरांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच अनुदानात भरीव वाढ करण्यात आल्याने आता तुलनेने मोठ्या आकाराची आणि सोयींनीयुक्त घरे दिली जाणार आहेत. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.'