आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाग्रामात परवानगी न दिल्याच्या वादावरून काँग्रेसचे कानावर हात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमाच्या परिसराबाहेरील यात्री निवास येथे आयोजित करण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला परवानगी नाकारल्यावरून सर्वोदयवादी गट आणि आश्रम प्रतिष्ठानात वाद सुरू झाला आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कुठलाही वाद नसल्याचा दावा केला आहे. 


२ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या पर्वावर बापू कुटीजवळील यात्री निवासाजवळ ही बैठक आयोजित करण्याची काँग्रेसची योजना होती. त्यासाठी काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सेवाग्रामला जाऊन परिसराची पाहणीही केली. यात्री निवासस्थानी आश्रम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, आश्रम प्रतिष्ठानने यात्री निवासात राजकीय कार्यक्रम आयोजित करता येणार नसल्याचे सांगत परवानगी नाकारली. त्यामुळे आता काँग्रेसने सेवाग्राममधील अन्य ठिकाणाचा बैठकीसाठी विचार सुरू केला आहे. सर्व सेवा संघाच्या महादेवभाई भवनात ही बैठक होण्याची शक्यता आहे. 


सर्वोदय मंडळाकडून टीका 
आश्रमाच्या भूमिकेवर आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानचे विजय दिवाण, मुंबई सर्वोदय मंडळाचे डॉ. विवेक कोरडे यांनी टीका करताना विनोबांच्या गागोडे या जन्मगावी ही बैठक आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीतच १९४८ मध्ये या ठिकाणी सर्वोदय समाज आणि सर्व सेवा संघाची स्थापना झाली असल्याने काँग्रेसला बैठकीसाठी ही जागा मागण्याचा नैतिक अधिकार असल्याचे दिवाण यांनी नमूद करत या वादात भर घातली आहे. काँग्रेसला येथून अँटी फॅसिस्ट चळवळ सुरु करायची असेल तर जागा देण्यावर आक्षेप का घेतला जातोय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


राजकीय कार्यक्रमास आश्रम प्रतिष्ठानचा आक्षेपच राहील 
आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टीआरएन प्रभू यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की, बापू कुटीजवळील यात्री निवास हा आश्रमाच्या परिसराचाच एक भाग आहे. त्यामुळे तेथे कुठल्याही राजकीय पक्षाला कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. ही आमची भूमिका पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळे परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आमच्यावर कोण काय टीका करतो, याकडे आम्ही लक्ष देणार नाही. 


परवानगी मागितली नाही 
या वादावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता असा कुठलाही वाद निर्माण झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. चव्हाण म्हणाले, आम्ही कुठल्याही जागेसाठी आश्रमाकडे लेखी परवानगी मागितली नव्हती. त्यामुळे आश्रमानेही आम्हाला परवानगी नाकारल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उगाच वाद निर्माण केला जात असून सेवाग्राम येथे कार्यसमितीची बैठक आयोजित करण्याचा निर्णयच गुरुवारी रात्रीपर्यंत होण्याची शक्यता असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 
 


बातम्या आणखी आहेत...