आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव- जिल्हा न्यायालयात विविध खटल्यांची सुनावणी सुरू असताना गुरुवारी दुपारी ४.३० वाजता हातात हॉकी-स्टीक घेऊन बाहेरुन आलेल्या आठ-दहा जणांच्या टोळक्याने जुन्या वादाच्या कारणावरून कोर्टाच्या आवारात एक तरुणावर हल्ला चढवला. तरुणास पोलिसांसमोर मारहाण करून फरफटत कोर्टाच्या बाहेर घेऊन जात चारचाकीतून पळवून नेले. यानंतर तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. मारहाण करून सागरपार्कवर अर्धमेल्या स्थितीत फेकून दिले. या तरुणावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना गुरुवारी घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
गोपाळ रामदास साळुंके (वय ३५, रा.धामणगाव वाडा, समतानगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. साळुंके यांचा भाचा तथा घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेला प्रदीप संतोष सपकाळे याने 'दिव्य मराठी'ला घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही दोघेजण गुरुवारी न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात आलाे होेताे. न्यायालयाच्या आवारात दैनंदिन कामे सुरू होती. संशयिताना घेऊन येणार पोलिस, वकील त्यांचे अशील, साक्षीदार, पंच व कामानिमित्त आलेल्या नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच आठ ते दहा जणांच्या टोळके हातात हॉकी स्टीक घेऊन न्यायालयाच्या आवारात आले. टोळक्याने थेट साळुंके यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. काही समजण्याच्या आतच अवघ्या काही मिनिटात टोळक्याने साळुंके यास पोलिसांसमोर फरफटत बाहेर अाणले. याठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये टाकून कार सुसाट वेगाने निघून गेली. दरम्यान, धावत्या चारचाकीत ही बेदम मारहाण केली. तसेच साळुंके यांच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बेदम मारहाण केल्यानंतर साळुंके यांना अर्धमेल्या अवस्थेत सागरपार्क येथे फेकून दिले. नंतर काही लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रामानंदनगर पोलिस सागरपार्कवर आले होते. त्यांनी नागरिकांच्या मदतीने साळुंके यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
संवेदनशील ठिकाणी घडला प्रकार; सीसीटीव्ही कैद, पोलिसांनी केली तपासणी
न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिस चाैकी आहे. त्यात नेहमी पोलिस असतात. मारहाण केल्यानंतर टोळक्याने याच प्रवेशद्वारातून साळुंके याला फरफटत नेले. तरीदेखील पोलिसांनी टोळक्यास अडवले नाही. जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांना झेड सिक्युरिटी आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारातही पोलिस बंदोबस्त असतो. अशा संवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या डोळ्यादेखत गुंडागर्दी करण्यापर्यंत टोळक्याची मजल गेली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार न्यायालयाच्या आवारात असलेल्या दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. घटना उघडकीस अाल्यानंतर शहर व रामानंदनगर पोलिसांनी एकत्रितपणे घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.
पोलिस ठाण्यातही झाली बाचाबाची
न्यायालयात घडल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात देखील दोन तरुणांमध्ये शिवीगाळ व बाचाबाची झाली. शहर पोलिस ठाण्यासमोर गाडीचा कट लागल्यावरून या तरुणांमध्ये भांडण सुरू झाले. त्यानंतर दोघे पोलिस ठाण्यात आले. एकमेकांच्या विरुद्ध तक्रार देण्याऐवजी त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना बाहेर काढले.
कानाखाली चाकूचे वार; उपचारासाठी ३३ एक्स-रे
टोळक्याच्या मारहाणीत साळुंक जखमी झाले आहे. त्याच्या डाव्या कानाच्या खाली चाकूने वार केला आहे. तसेच संपूर्ण शरीरावर मुक्कामार बसल्यामुळे फ्रॅक्चर तपासण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल ३३ एक्स रे काढले. रामानंदनगर पोलिस जबाब घेण्यासाठी आले होते; परंतु मारहाण झाल्यापासून साळुंके बेशुद्ध असल्यामुळे जबाब घेता आला नाही.
तीन महिन्यांपूर्वीच्या वादाचा वचपा
तीन महिन्यांपूर्वी आकाशवाणी चौकात दोन गटात हाणामारी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात गँगवार सुरू झाले आहे. गुरुवारी न्यायालयात साळुंके यांना याच वादातून मारहाण झाल्याचे प्रदीप सपकाळे याने सांगितले आहे. शैलेश ठाकरे (पूर्ण नाव माहित नाही) याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.