आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीएससी सेंटरचा कारभार रामभरोसे, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे परत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- ऑनलाइन सर्व्हिस देणाऱ्या जिल्ह्यातील कॉमन सर्व्हिस सेंटरचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे या केंद्रामार्फत शासकीय योजनांसाठी केलेले अर्ज, पीकविमा आदींचे प्रस्ताव त्रुटीमुळे मुदतीनंतर परत येत असल्याने ग्राहकांचा रोष वाढत असताना दुसरीकडे केंद्र चालकांना या अडचणी मांडण्यासाठी नेमलेला अधिकारीच गायब राहात असल्याने अडचणी मांडायच्या कोठे, असा प्रश्न पडला आहे. 

 

राज्य व केंद्र शासनाने सर्व विभागाचे कामकाज डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेऊन या अनुशंगाने मागील चार वर्षात पाऊलही उचलले. यामुळे सोय होईल असे अपेक्षित असताना नागरिकांबरोबरच प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही मोठी गैरसोय झाली. याच ऑनलाइन कारभाराच्या धर्तीवर राज्यात महा ई सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले. याद्वारे विविध शासकीय सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस होता. तसेच सुशिक्षित बेराेजगारांनाही यातून रोजगार उपलब्ध होणार होता. त्यामुळे या केंद्राची घोषणा झाल्यानंतर जिल्हाभरात जागोजागी महा ई सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू झाले.

 

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत. परंतु, या सेंटरचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेमलेले समन्वयकांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य, मार्गदर्शन मिळणे तर दूरच यातील एक अधिकारी तर फोन देखील उचलत नसल्याने सदरचे केंद्र चालक बेजार झाले आहेत. या केंद्राद्वारे शंभरावर सेवा पुरविण्यात येतात. 

 

सीएससी सेंटरद्वारे मिळणाऱ्या सेवा 

सदरील कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे विमा, पीकविमा, पॅनकार्ड, आरटीओ फ्लॅग, इंन्शुरन्स, वीजबिल, फोनबिल, सर्व प्रकारचे रिचार्ज, हेल्थ सर्व्हिस, वाहन विमा, अटल पेन्शनचे अर्ज अशा शंभरावर सेवा पुरविण्यात येतात. परंतु, केंद्र चालकांना आवश्यक मार्गदर्शन न मिळाल्याने बोटावर मोजण्याइतकेच सेवा सुरू आहेत. 

 

तक्रारी सोडविण्यास वाली नाही, दाद कुठेे मागावी 
जिल्ह्यातील सीएससी केंद्रचालकांच्या अडचणी, तक्रारींचे निवारण,त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी दोन जिल्हा समन्वयक नेमण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे तालुकेही वाटून दिले. परंतु, यातील एक अधिकारी फोनही उचलत नाही, मार्गदर्शनही करत नसल्याने दुसराही बेजार झाला आहे. याबाबत संबधित यंत्रणेने आवश्यक ती कार्यवाही करून ही यंत्रणा सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

 

केंद्रचालकांचे पैसेही न मिळाल्याने नाराजी 
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत ऑनलाइन अर्जासाठी तसेच पीकविमा भरणेकरीताही या सीएससी केंद्रांनी मोलाची कामगिरी बजावली. यासाठी केंद्र चालकांना प्रति अर्ज १० रुपये देण्यात येतील असे सांगण्यात आले होते. परंतु, हे अर्ज भरून वर्ष लोटले तरी जिल्ह्यातील शेकडो केंद्र चालकांचे लाखो रुपये अडकले असून दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न पडला आहे. 

 

पैसे गेले परंतु, पीक विम्याच्या पावत्या नाहीत 
या केंद्र चालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने गैरसोयी होत आहेत. आमच्या सी वाॅलेटमधून पीकविम्यासाठी पैसे कट झाले. परंतु, विम्याची पावती मिळाली नाही. अनेकांचे पीकविम्याचे अर्ज व पैसे प्रथम स्वीकारले गेले. नंतर फक्त पैसेच परत आले. मात्र ते कोणत्या शेतकऱ्यांचे हेच कळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.