आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक शोधण्यासाठी बँकांच्या लेखा परीक्षणाचा दक्षता आयोगामार्फत तपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांच्या लेखापरीक्षण अहवालाची तपासणी सुरू केली आहे. कर्ज प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक तर झाली नाही ना, याचा तपास यात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तपासात बँकिंग प्रणालीमध्ये एखादी त्रुटी आढळून आली तर त्यावर उपायदेखील सांगण्यात येणार आहे. अलीकडच्या वर्षांत बँकिंग प्रणालीमध्ये फसवणुकीच्या प्रकरणांत वाढ झाली असल्याने या तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर अनुत्पादित कर्जात म्हणजेच एनपीएमध्येही तेजीने वाढ झाली आहे.  

 

अर्थ मंत्रालयाच्या वतीने लोकसभेत अलीकडेच दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षात बँकांतील फसवणुकीची ५९१७ प्रकरणे समोर आली आहेत. तर या वर्षी आतापर्यंत ३,४१६ प्रकरणे पकडण्यात आली आहेत.

 

दक्षता आयुक्त टी. एम. भसीन यांनी सांगितले की, आयोग केंद्रीय स्टॅच्युअरी अहवाल आणि इतर ऑडिटर्सच्या अहवालाची समीक्षा करत आहे. ही समीक्षा बँका आणि विमा कंपन्यांच्या मुख्य व्हिजिलन्स अधिकाऱ्याकडून करून घेण्यात येत आहे. हे अधिकारी केंद्रीय दक्षता आयोगाचेच प्रतिनिधी असतात. एखाद्या संघटनेमध्ये भ्रष्टाचार आणि फसवणूक थांबवण्याचे त्यांचे काम असते.  बँकांच्या वतीने फसवणुकीच्या देण्यात आलेल्या माहितीचा तपास रिझर्व्ह बँकेच्या वतीने केला जातो. कोणत्याही कर्जात फसवणूक लवकरात लवकर पकडण्यासाठी आणि तपास संस्थांना त्यासंबंधी तत्काळ माहिती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक आकृतिबंध तयार केला आहे. ५० कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या कर्ज प्रकरणात बँकांना तत्काळ कारवाई करावी लागते. अशा खात्यांना रेड फ्लॅग्ड अकाउंट (आरएफए) असे म्हणतात. कोणत्याही कर्ज खात्याला या श्रेणीमध्ये टाकल्यानंतर बँकांना याची माहिती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर द्यावी लागते. यामुळे इतर बँकांनाही त्यांची माहिती मिळते.
 
भसीन यांनी सांगितले की, केंद्रीय दक्षता आयोगाने ऑक्टोबरमध्येच १०० मोठ्या बँकिंग फसवणुकींचे विश्लेषण पूर्ण केले आहे. ही फसवणूक करणाऱ्या कंपन्या १३ क्षेत्रांशी संबंधित आहेत. यामध्ये जडजवाहिर, निर्मिती, कृषी, मीडिया, विमान, ट्रेडिंग, माहिती तंत्रज्ञान, निर्यात, एफडी आणि लेटर ऑफ कन्फर्टचाही समावेश अाहे. आयोगाने तपासाचा अहवाल रिझर्व्ह बँक, आयटी आणि सीबीआयलादेखील पाठवला आहे. कंपन्या ही फसवणूक कशा प्रकारे करतात, याची माहिती आयोगाने जमा केली आहे. या आधारावर बँकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करता येईल. या सूचना रिझर्व्ह बँकेसोबतच आर्थिक सेवा विभागालाही देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...