आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजेक्शन शूट करून नरभक्षक वाघाला बेशुद्ध करण्याची मिळाली अखेर परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती /धामणगाव रेल्वे - धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोघांवर हल्ला करून त्यांना ठार करणाऱ्या वाघाची चांगलीच दशहत निर्माण झाली असतानाच राज्याच्या प्रधान वन संरक्षकांनी त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन शूट करण्याची परवानगी बुधवारी (दि.२४ आॅक्टोबर) िदल्यामुळे अंजनसिंगी येथील गावकऱ्यांसह वन विभागालाही िदलासा िमळाला आहे. तीन िदवसांपासून वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मिळावी,यासाठी वन विभाग पाठपुरावा करीत होता. सध्या वाघाने त्याचा मुक्काम हलवला असून, बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अंजनसिंगी ते कुऱ्हा रस्त्यावर लागणाऱ्या कॅनलच्या उजव्या भागात उत्तरेकडे काळा गोठा गावाच्या रस्त्याने वाघाला जाताना एका व्यक्तीने पाहिल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी दिली. 

 

अंजनसिंगी येथील लोअर वर्धा धरणाला जाऊन िमळणाऱ्या नाल्याच्या परिसरात सहायक वनसंरक्षक बोंडे यांच्या नेतृत्वात ७५ वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तैनात असून, यापैकी बहुतेक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे आणिबाणीचा प्रसंग आला तर पिस्तूल, बंदुकी देण्यात आल्या आहेत. सोबतच वाघाला पिंजऱ्यात पकडण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. 

 

वाघाच्या दहशतीमुळे अंजनसिंगी येथील नागरिकांना नाल्याच्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला असून,परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. २०१५ च्या शासकीय अध्यादेशाप्रमाणे दहा लाखांची मदत वनविभागाने जाहीर केली आहे.त्यामध्ये तीन लाख रुपये रोख, तर सात लाख रुपये मुदती ठेव म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात येते.त्यानुसार दोन मृतकांच्या कुटुंबीयांना रोख स्वरूपातील प्रत्येकी ३ लाख चांदुर रेल्वेचे वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या खात्यात बुधवारी (ता.२४) जमा करण्यात आली. 

 

पालकमंत्र्यांचे वनमंत्र्यांना पत्र 
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीरचे रहिवासी शेतकरी राजेंद्र निमकर व अंजनसिंगी येथील शेतमजूर मोरेश्वर वाळके हे वाघाने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. संपूर्ण परिसर नरभक्षक वाघाच्या दहशतीखाली असून या वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने कारवाईसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे विनंती केली. त्याचप्रमाणे, हल्ल्यात बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणीही केली आहे. नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजनेची मागणी केली आहे.तुर्तास बेशुद्ध करण्याची परवानगी मिळाली आहे. 

 

दोन म्हशीच्या पिलांची शिकार करून वाघाने सोडला अंजनसिंगीचा मुक्काम 
मंगरूळ दस्तगीर शेतकरी राजेंद्र निमकर (४५) नंतर अंजनसिंगी येथील मजूर मोरेश्वर वाळके यांचा बळी घेणाऱ्या वाघाने चौथ्या दिवशी अंजनसिंगी गावाजवळ "बिट"म्हणून ठेवलेल्या दोन म्हशीच्या पिलांची शिकार करून बुधवारला अंजनसिंगी येथील मुक्काम सोडून आगेकूच केल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी अंजनसिंगी येथील पनई नाल्याजवळ 'बिट' म्हणून दोन म्हशीचे पिले ठेवण्यात आली होती.या नरभक्षक वाघाने अंजनसिंगी परिसरातील आपले वास्तव्य सोडून दुसरीकडे आगेकूच केली आहे. 

 

दरम्यान,वनमंत्री मुनगंटीवार यांच्या आदेशाने मुख्य वन संरक्षक अधिकारी (वन्यजीव) अशोक मिश्रा व मुख्य वन संरक्षक (वने) उमेश अग्रवाल यांनी या वाघाला बेशुद्ध करण्याची बुधवारी (दि.२४ आॅक्टोबर)परवानगी दिल्याची माहिती अमरावती विभागाचे मुख्य वनरक्षक प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे. 

 

हालचाली कॅमेऱ्यात कैद : अंजनसिंगी येथील पनई नाल्या जवळ लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये या नरभक्षक वाघाच्या हालचाली कैद झाल्या आहेत .त्याने दोन दिवस अंजनसिंगी शिवारात मुक्काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र झाडा झुडपं व शेतात तूर, कपाशी इत्यादी पिके असल्याने स्पष्ट व अचूक निदान लावणे कठीण असल्याने हा ट्रॅप कॅमेरा कुचकामी ठरला आहे. 

 

वर्धेत एकाने विहिरीत घेतली उडी, दुसरा चढला झाडावर 
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दोघांचा बळी घेणाऱ्या या वाघापासून वर्धा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांचे नशिबाने प्राण वाचले. हा वाघ वरुड, बोर अभयारण्य आणि वर्धा जिल्ह्यातून धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर, अंजनसिंगी येथे आला. तत्पूर्वी वर्धा जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असताना त्याला माणसांचा गंध आला. तो एका शेतात दबा धरून बसल्याचे तेथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्याने या दोन शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता एकाने जवळच्या विहिरीत उडी घेऊन तर दुसऱ्या शेतकऱ्याने उंच झाडावर चढून स्वत:चा जीव वाचवला. या दोन शेतकऱ्यांना वेळीच वाघाच्या हल्ल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी स्वत:चा बचाव केला. 

 

शार्प शूटर दाखल : या नरभक्षक वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याची परवानगी मिळाल्याने रैपिड रिस्पाॅन्स युनिटचे बुलडाणा येथील संजय राठोड व अमरावतीचे अमोल गावनेर धामणगाव तालुक्यात दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे नरभक्षक वाघ हा ज्या गावामध्ये प्रवेश करण्याचा धोका आहे, अशा संभाव्य गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक गावांत रात्रीला ग्रामस्थ टेंभे घेऊन घराबाहेर पडत आहेत.तर काही गावातील लोक 'जागते रहो' चा पहारा देत रात्र जागून काढत आहेत. 

 

म्हणून वाघाची शिकार करण्याची पद्धत वेगळी 
हा अडीच वर्षीय नर वाघ अगदी बालपणीच त्याच्या आईपासून कोणत्यातरी कारणाने वेगळा झाला असावा. त्यामुळे त्याला शिकार कशी करतात याची व्यवस्थित शिकवण िमळाली नाही. वाघिण तिच्या पिलांना शिकार कशी करायची याचे धडे देत असते. मात्र या वाघाला तसे धडेच िमळाले नाहीत. त्यामुळे त्याची शिकार करण्याची पद्धतच वेगळी आहे. हा प्राणी, मनुष्यावर हल्ला करून त्यांना पूर्ण फाडून खातो. आईपासून बालपणीच वेगळा झाल्यामुळे काहीसा चवताळल्यासारखा वागतो. वाघ हा फार चतूर प्राणी आहे. त्यामुळे तो सहज कोणाच्याही हाती येत नाही. सतत स्थान बदलत असतो, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी िदली आहे. 

 

वाघाचा धोका, आज १४ गावांतील शाळांना सुटी 
धामणगाव तालुक्यात वाघाचा वावर २५ आक्टोंबरपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने १४ गावांतील शाळांना गुरूवार ( ता.२५ ) सुटी देण्याचे आदेश प्रशासनाने िदले आहेत. यात अंजनसिंगी,अंजनवती, ढाकुलगाव,गव्हा फरकाडे, अशोकनगर, धारवाडा, बोर्डा, चेंनूष्टा ,सालोरा, जळका जगताप, वाढोणा, गुंजी, आमला विश्वेश्वर, मसदी या चौदा गावांचा समावेश आहे. 

 

वाघ पकडल्याची अफवा 
तीन िदवसांत दोन शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या वाघाने म्हशीला ठार केल्यानंतर गायीच्या बछड्याला गंभीर जखमी केले. हा नरभक्षक वाघ पकडला गेल्याची अफवाही पसरली. यासंदर्भातील व्हीडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हीडीओ खोटा असून असे काही घडले नाही. कोणीही या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले. 

बातम्या आणखी आहेत...