आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आमचा जल्लोष कधी? धनगर बांधवांचा फडणवीस सरकारला सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/माजलगाव- हिवाळी अधिवेशनाची तारीख वाढवा नाही तर  विशेष अधिवेशन बोलावून धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. समाजाला फसवण्याचे काम फडणवीस सरकारने केले असून आरक्षणप्रश्नी सोमवारी (१७ डिसेंबर) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सुंबरान मोर्चा काढणार असल्याची माहिती धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी दिली.

 

आरक्षणाचा प्रश्न या अधिवेशनात सोडवला नसल्यामुळे धनगर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता आमच्या जल्लोषाची तारीख कधी असा सवाल धनगर समाजाकडून  सरकारला विचारला जात आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिले होते. 'टीस'चा अहवाल सरकारला देऊन तीन महिने  उलटले. केवळ अभ्यासाच्या नावाने धनगर समाजाची दिशाभूल करण्याचे काम  हे सरकार करत आहे. चालू अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांनी धनगर आरक्षणाचा अहवाल पटलावर मांडून त्यासाठी  केंद्राकडे पाठपुरावा करून  अंमलबजावणी करावी, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या अधिवेशनात आरक्षण प्रश्न मार्गी लावू, असे म्हणाले होते. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर अधिवेशन घेणार की काय? अधिवेशनाची तारीख वाढवून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा नसता विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा. त्यामुळे धनगर आरक्षण प्रश्नी आता १७ डिसेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सुंबरान मोर्चा काढला जाणार असल्याचे भारत सोन्नर यांनी सांगितले.

 

माजलगावात धनगर आरक्षणाचा आज 'महाएल्गार';उपस्थित राहण्याचे आवाहन

राज्य शासनाने आरक्षण देण्याच्या नावाने चालढकल करत धनगर समाजाची दिशाभूल चालवली आहे. त्यामुळे शासनाविरोधात हा रोष व्यक्त करण्यासाठी माजलगाव येथे शुक्रवारी (दि. ३०) दुपारी तीन वाजेदरम्यान शहरातील मोंढा मैदानावर 'महाएल्गार' मेळावा आयोजित केला आहे. गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे. धारूरचे माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ, जिल्हा परिषद सदस्य कल्याणराव आबूज यांच्या पुढाकारातून या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यानिमित्ताने आयोजक माधवराव निर्मळ, कल्याण आबूज, नाना वगरे, बबनराव सरवदे, डॉ. भगवानराव सरवदे, प्रा. प्रकाश गवते, रामेश्वर गवळी, अॅड. रोहिदास गोरे, सुधाकर शेळके, उद्धव कुंडकर, गणेश बोडखेंसह सहकाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेतल्या. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...