आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरपोच दारु पुरवठ्याचे धोरण आणण्याच्या विचारावर झालेल्या टीकेनंतर, बावनकुळेंचं घूमजाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -'ड्रंंक अँड ड्राइव्ह'मुळे वाढत्या अपघातांनी चिंताग्रस्त झालेले महाराष्ट्र सरकार आता ऑनलाइन व घरपोच दारू पुरवठ्याचे धोरण आणण्याचा विचार करीत असल्याचे धक्कादायक संकेत उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले. मात्र यावर टीकेची झोड उठताच रविवारी घूमजाव केले. ग्राहक व व्यापाऱ्यांकडून अशी मागणी होत असली तरी सरकार मात्र तसा निर्णय घेणार नसल्याचे बावनकुळेंनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले. अाॅनलाईन मद्यविक्रीला परवानगी हा तर गुन्हा असल्याचेही ते म्हणाले. 

 

बावनकुळेंनी शनिवारी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना 'ड्रंक अँड डाइव्ह' मुळे अपघाती मृत्यूचे वाढते प्रमाण टाळण्यासाठी अाॅनलाइन व घरपोच दारूच्या पुरवठ्याचे धोरण अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले हाेते. तसेच असे धाेरण अाखणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असेल, अशी मखलाशीही त्यांनी केली हाेती. भाजीपाला व किराणा सामानाची 'ऑनलाइन' व घरपोच खरेदी केली जाते, त्याचप्रमाणे दारूही उपलब्ध होईल. घरपोच दारू उपलब्ध करताना पिण्याच्या परवानाही तपासला जाईल.' असेही त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झाेड उठताच रविवारी घूमजाव केले. 


बावनकुळे म्हणाले, 'घरी बसून दारू पिण्याचा ट्रेंड वाढत आहे. त्यामुळे काही घटकांनी अशी मागणी केली आहे. दुकानातून दारूची खरेदी करणे शक्य होत नसल्याने सरकारने ती ऑनलाइन घरी सर्व्ह करण्याची परवानगी द्यावी, अशी ही मागणी आहे. मुंबईतून तसा एक अर्जही अाला हाेता. मात्र, या मागणीवर सरकार कुठलाही विचार करणार नाही,'असेही ते म्हणाले. 'सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हाॅट्सअॅप वा अन्य माध्यमातून दारू घरी मागवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत,' याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले. 

 

सरकारला महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत का; स्वामिनी आंदोलकांची टीका 
यवतमाळ जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून दारूबंदीचे आंदोलन चालवणारे स्वामिनी दारूबंदी आंदोलनाचे संयोजक महेश पवार म्हणाले, शासनाचे प्रस्तावित धोरण अशोभनीय आहे. दारूमुळे वाढत्या अपघातांची चिंता असलेल्या सरकारला यामुळे महिलांवरील वाढते अत्याचार, गुन्हेगारी दिसत नाही. घराघरात दारू पोहोचवून सरकारला लोकांचे आरोग्य धोक्यात आणायचे आहे काय? या निर्णयाचे गंभीर परिणाम सरकारला आणि समाजाला भोगावे लागतील.' 

 

ही तर सरकारकडून दारूबंदीची चेष्टा, राज्यात आक्रोश यात्रा काढणार : कदम 
महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलनाचे अध्यक्ष गणेश कदम म्हणाले, सरकारच्या या धोरणामुळे घरोघरी मुले दारूच्या आहारी जातील. सरकारला राज्यातील लाखो कुटुंबे देशोधडीला लावायची अाहेत का? हे प्रस्तावित धोरण आमच्यासारख्या दारूबंदी कार्यकर्त्यांची चेष्टा आहे. सरकारला दारूतून २३ हजार कोटींचा महसूल मिळतो. सरकारला तो आणखी वाढवायचा आहे का?. राज्यात दारूबंदीसाठी नोव्हेंबर महिन्यात अाम्ही पुणे ते मुंबई अशी 'आक्रोश यात्रा' काढणार आहोत. 

बातम्या आणखी आहेत...