आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार गावांवर दुष्काळाचे ढग, दुष्काळ देखरेख समितीच्या अहवालात जिल्ह्यातील दहा तालुके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कमी पावसामुळे जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर तालुके वगळता ११०९ गावे दुष्काळाच्या छायेत आहेत. राज्य सरकारने दुष्काळाची अधिकृत घोषणा केली नसली, तरी जिल्ह्यातील दहा तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८६८ गावांमधील पाण्याची पातळी एक ते तीन मीटरने घटली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. पावसाने आेढ दिल्याने पाथर्डी तालुक्यातील मढी येथे तीन एकरांवरील कांदा जळू लागल्याने परसराम मरकड या शेतकऱ्याने पिकावर ट्रॅक्टर फिरवला. 

 

जिल्ह्यात यंदा ६९ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षी १६१ टक्के पाऊस झाला होता. यंदा ९२ टक्के कमी पाऊस झाला. कमी पावसामुळे टँकरला मागणी वाढू लागली आहे. ऑक्टोबर महिन्यातच टँकरची संख्या ८० वर गेली आहे. जिल्ह्यात ४ लाख ३० हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. यंदा खरिपाच्या १ हजार ६०० गावांपैकी ५८२ गावांमध्ये ५ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. यंदा १ लाख ३० हजार हेक्टरवर जास्त पेरण्या झाल्या. मात्र, पावसाअभावी सर्व पिके जळून गेली. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे उत्पादन यंदा ८० टक्क्यांनी घटले. खरीप वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पावसाची अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. आतापर्यंत ७ लाख हेक्टरपैकी केवळ ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या. मात्र, पाणीच नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला अाहे. 

 

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या. मात्र, पावसाने दडी मारल्याने या सर्व पेरण्या वाया गेल्या त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळीही कमालीची घटली आहे. विहिरीही तळ गाठू लागल्या आहेत. ग्रामीण भागात ऑक्टोबर महिन्यापासूनच चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे. चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदा कोपरगाव येथे शंभर एकर क्षेत्रावर प्रशासनाने चारा पिकांचे नियोजन केले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामीण भागात सत्यमापन चाचणी समितीमार्फत दुष्काळाची स्थिती जाणून घेतली जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात आली आहे. 

 

कर्जत, नगर, नेवासे, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव व श्रीगोंदे तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ आहे. जामखेड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे. राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या अहवालात या तालुक्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३५० गावांपैकी तब्बल १ हजार गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. 

 

प्रशासनच संभ्रमात 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करून जमीन महसुलात सुट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी वीजबिलात सुट, शालेय विद्यार्थांना परीक्षा शुल्कात सूट देण्याचा ही निर्णय फडवीस यांनी घेतला.मात्र या निर्णयाची माहिती स्थानिक प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना उपाययोजनांचा किती गावांना फायदा होईल, असे िवचारले असता पाहून सांगतो, असे त्यांनी सांगितले. 

 

सन २०११ च्या दुष्काळाची होणार यंदा पुनरावृत्ती 
जिल्ह्यात २०११ मध्ये कमी पावसामुळे दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली होती. २०११ मध्ये बबनराव पाचपुते हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातच दुष्काळाची स्थिती उद्दभवली होती. चारा डेपो, जनावरांच्या छावण्या यासह अन्य दुष्काळी उपाययाेजनांवर त्यावेळी तब्बल एक हजार कोटीचा खर्च झाला होता. यंदा तीच परिस्थिती उद््भवण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवाड्यापासूनच जिल्ह्यात चारा टंचाई भासू लागली आहे. 

 

३३८ गावांतील पाणीपातळी एक ते दोन मीटरने घटली 
पावासाअभावी तब्बल ८६८ गावांमधील जमिनीमधील पाण्याची पातळी एक ते तीन मीटरने घटली आहे. ३३८ गावांमधील पाणी पातळी एक ते दोन मीटरने घटली आहे. त्यात श्रीगोंदे तालुक्यातील सर्वाधिक ६३ गावांचा समावेश आहे. २८४ गावांची दोन ते मीटर पाणी पातळी खाली गेली आहे. त्यात पारनेर तालुक्यातील सर्वाधिक ४० गावे आहेत. २४६ गावांची पाणी पातळी तीन मीटरपेक्षा जास्त घटली आहे. 

 

छावण्या सुरु व्हाव्यात 
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली.या घोषणेचे स्वागतच आहे.मात्र, पिण्याचे पाणी, वांबोरी चारी हे प्रश्नही तातडीने सुटले पाहिजेत. सध्या जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तातडीने छावण्या सुरु झाल्या पाहिजेत.त्याचबरोबर तहसीलदारांचा टँकर मंजुरीचे अधिकार द्यावेत.'' शिवाजी कर्डिले, आमदार. 

 

पिकवायचे काय आणि खायचे काय ? 
पाऊस येईल या अपेक्षेने टँकरचे विकत पाणी घेऊन कांदा जगवला. तीन एकर कांद्याच्या लागवडीसाठी १६ हजार खर्च झाले. बियाणे, मजुरीसह ७० हजारांचा खर्च झाला. पण पाऊसच न झाल्याने हा खर्च वाया गेला. पिकवायचे काय आणि आम्ही खायचे काय ? असा प्रश्न आहे.'' परसराम मरकड, शेतकरी. 

 

लवकरच बैठक घेणार 
मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी दुष्काळ जाहीर करुन दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा दिला. उपाययोजनांना प्रशासकीय पातळीवर गती मिळेल. सर्वसामान्यांना दुष्काळाच्या झळांची तीव्रता सोसावी लागणार नाही.असे कार्यक्रम हाती घेतले जातील. लवकरच शेवगाव-पाथर्डी तालुका प्रशासनाची बैठक घेऊन अाढावा घेणार आहोत.'' मोनिका राजळे, आमदार. 

बातम्या आणखी आहेत...