आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली, भाजपमध्ये खलबते मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता दिसते कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विजयादशमीच्या दिवशी मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. मात्र, या विस्तारात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा स्थान द्यायचे की भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायची यावर विचारविनिमय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 


सूत्रांनुसार, एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी अजूनही हिरवा कंदील दिलेला नाही. त्यामुळे थेट प्रदेशाध्यक्षपदाचीच जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. या दृष्टीने पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून काही ठोस मार्ग काढण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेषत: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय पातळीवर हा बदल करण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते. 


जळगावमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलताना खडसे यांनी आपण मंत्रिमंडळात जाण्यास उत्सुक नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, एकीकडे त्यांनी मंत्रिपद स्वीकारण्यास अनुत्सुकता दर्शवली असली तरी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री जळगावात असताना चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन व खडसे सोबत होते. त्यामुळे खडसेंना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार याबद्दल उत्सुकता आहे. 

 

प्रदेशाध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री अनुकूल 
सूत्रांनुसार, खडसे यांच्या मंत्रिमंडळातील वापसीला मुख्यमंत्री फडणवीसांचा अजूनही हिरवा कंदील नाही. तथापि, त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याकडे त्यांचा कल आहे. शिवाय, प्रदेशाध्यक्षपद खडसेंकडे दिले जाणार असल्याबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला काही आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. 

 

भाजप अध्यक्ष मुंबईत, घडामोडींना वेग : भाजप अध्यक्ष अमित शहा मंगळवारी सायंकाळी अचानक मुंबईत दाखल झाले. नियोजित मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शहा यांची मुंबई भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईत आल्यानंतर शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने घडामोडींना वेग आला आहे. 

 

मंत्रिपद का शक्य नाही? 
खडसेंवर आरोप आहेत. शिवाय शिवसेनेकडून आगामी निवडणुकीत युती करण्याची तयारी असल्यास त्यांना विस्तारात अधिक स्थान द्यावे लागेल, त्यामुळे भाजपला कमी खात्यांवर समाधान मानावे लागणार आहे. 

 

बहुजन-ओबीसी समाज पाठीशी, म्हणून प्रदेशाध्यक्षपद... 
- रावसाहेब दानवे हे मराठा असले तरी बहुजन, ओबीसी समाज एकनाथ खडसेंच्या मागे आहे. 
- काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाली व शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले तर खडसेंचे वक्तृत्व व नेतृृत्वाचा उपयोग पक्षाला होऊ शकतो. 

 

दिल्लीतही झाली होती चर्चा 
सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महामंत्री रामलाल यांची बैठक झाली. यात खडसे यांची नाराजी कशी दूर करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.

बातम्या आणखी आहेत...