आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाआघाडीत सहभागासाठी 'बसप'चे तळ्यात-मळ्यात; धुरा नव्या टीमकडे लाेकसभेसाठी सुरेश माने यांच्या बीआरएसपीचे बसपपुढे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रात कायमच स्वबळावर निवडणुकीला सामोरा गेलेला बहुजन समाज पक्ष (बसप) आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत जाण्यास उतावीळ आहे. त्यातच 'बसप'तून फुटून अस्तित्वात आलेल्या 'बीआरएसपी'ने पक्षासमोर विदर्भात आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बसपच्या नव्या नेतृत्वासमोर मतांचा घसरता टक्का कसा राखायचा याबाबत चिंता निर्माण झाली आहे. 

 

२००३ मध्ये मायावती 'बसप'च्या अध्यक्षा झाल्या. तेव्हापासून बसप महाराष्ट्रात निवडणुका लढवत आहे. या पक्षाला राज्यात विधानसभा व लोकसभेची आजपर्यंत एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र, अर्ध्या अधिक मतदारसंघात बसप उमेदवार कायम दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या स्थानावर राहत आलेले आहेत. २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघात लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासंदर्भात बहनजींचा विचार सुरू आहे, असे 'बसप'चे राज्य अध्यक्ष सुरेश साखरे यांनी सांगितले. 

 

२००४ पासून राज्यातील बसपची सूत्रे मुंबईच्या विलास गरुड यांच्याकडे होती. गरुड यांच्या काळात पक्षाने लोकसभेला ४८ आणि विधानसभेला २८८ जागी उमेदवार देण्यात यश मिळवले होते. तसेच बसपचा राज्यातील ०.३ टक्के असलेला मतांचा टक्का ४.८३ पर्यंत नेण्याची किमया साधली होती. जानेवारी २०१८ मध्ये विलास गरुड पायउतार झाले. त्यांच्या जागी विदर्भातील सुरेश साखरे (नागपूर) यांची नेमणूक झाली. साखरे यांच्या दिमतीला ४ प्रभारी, महासचिव, उपाध्यक्ष आणि १२ जनरल सेक्रेटरी आहेत. बसपची ही नवी टीम या वेळी २०१९ च्या लोकसभेचा राज्यात मुकाबला करणार आहे. राज्यात बसपचे संघटन वाढवण्यात मोलाची भूमिका बजावलेले व बामसेफ संघटनेचे अध्यक्ष अॅड. सुरेश माने (मुंबई) बसपमधून बाहेर पडले आहेत. त्यांनी २०१५ मध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष (बीआरएसपी) स्थापन केला. माने यांनी दोन वर्षांत विदर्भात संघटन बांधले आहे. या वेळी लोकसभेला बीआरएसपी मैदानात आहे. त्याचाही बसपला फटका बसू शकतो. 

 

गेल्यावेळी लाेकसभेला मिळाली अडीच टक्के मते 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बसपने २८० जागा लढवल्या होत्या. त्यात पक्षाला ११ लाख ९१ हजार ८४६ (२.२५ टक्के) मते मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपने राज्यात ४८ जागा लढवल्या होत्या. त्यात बसपला १२ लाख ७१ हजार ६८० (२.६३ टक्के) मते मिळाली होती. दरम्यान, यंदा राज्यात बसपा किती मते घेते याकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. 

 

महाराष्ट्रात बसपची लाेकप्रियता घटली ? 
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, आंबेडकर भवन पाडकाम, नक्षलवादी समर्थक असल्याचे झालेले आरोप यामुळे भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना समाजातून मोठी सहानुभूती मिळते आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील छोटेमोठे रिपाइं गट निष्प्रभ झाले आहेत. परिणामी बसपचा मतदार या वेळी आंबेडकर यांच्या मागे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूण अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित मतदारांमध्ये आजपर्यंत बसपची असलेली लोकप्रियता कमालीची घटली असून आगामी लोकसभा निवडणुकीत बसपला त्याचा जोराचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.