आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरगावातील दसरा मेळाव्यातून पंकजांना निवडणुकीपूर्वी शक्तिप्रदर्शनाची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत १८ ऑक्टोबर रोजी संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा होत आहे. हा दसरा मेळावा म्हणजे संत भगवानबाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर समाजबांधवाच्या असलेल्या भक्तीचा मेळा ठरत आहे. दसऱ्यालाच संत पाण्यावर आसनस्थ भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही पंकजा यांच्या हस्ते होणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक, ऊसतोड कामगारांचा न मिटलेला संप या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी होणार आहे. 


संत भगवानबाबांची कर्मभूमी असलेल्या भगवनागडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि दसरा मेळावा एक खूप मोठे समीकरण होते. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो ऊसतोड कामगार मुंडे साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी येत असत. मुंडेंच्या निधनानंतर भगवान गडावर मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेऊ नये, तेथे राजकीय भाषण करू नये याला गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी बंदी घातल्याने तीन वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याशीच पंकजा यांना मेळावा घ्यावा लागला होता. त्यानंतर सावरगाव येथील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव मागील वर्षीपासून भगवानबाबांचे जन्मस्थळी सावरगावात दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. १८ ऑक्टोबर रोजी होणा ऱ्या दसरा मेळाव्याची वर्षभरापासून पंकजांकडून तयारी सुरू आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका, तसेच ऊसतोड कामगारांचा न मिटलेला संप या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला १० लाख लोक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. 


२ एकरात स्मारक, १० एकरात मेळावा : सावरगाव येथील दोन एकराच्या परिसरात स्मारक तयार करण्यात आले असून तेथे संत भगवानबाबा ज्ञानेश्वरीचे वाचन करीत असल्याची २५ फूट उंचीची पाण्यावर आसनस्थ मूर्ती स्थापन केली जाणार आहे. या मूर्तीचे लोकार्पण दसऱ्यालाच पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते होणार अाहे. नगर येथील मूर्तिकार प्रमोद कांबळे यांनी ही मूर्ती तयार केली असून १५ ऑक्टोबरला ती सावरगावात आणली जाणार आहे. याच ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी दहा एकर जागेत स्टेज उभारले जाणार आहे. यंदा दसरा मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातील संत महंत विविध संस्थान गडाचे मठाधिपती यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 


चहापाणी अल्पोपाहाराची व्यवस्था 
मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी मार्गावर ठिकठिकाणी चहा व अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात येणार अाहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवले जाणार आहेत. बंदोबस्तावरील पोलिसांसाठी जेवणाची, निमंत्रितांची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. सावरगाव येथील वाहली रोड व हनुमान गड कमानीच्या डाव्या बाजूला जवळपास २५ हजार वाहने लावता येतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. 


दोन ठिकाणी हेलिपॅड 
दसरा मेळाव्यासाठी ग्रामविकास पंकजा मुंडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सहकारी मंत्री येणार असल्याने सावरगाव येथे दोन ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात येत त्याचे कामही सुरू अाहे. दसऱ्याला हेलिपॅडवर उतरल्यानंतर मंत्री पंकजा यांच्यासह खासदार मुंडे व निमंत्रित मान्यवर उघड्या जीपमध्ये बसून थेट सावरगाव येथील संत भगवानबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर स्मारकाच्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे मंदिर ते स्मारक परिसरापर्यंत एक कि.मी.चा रस्ता तयार करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार व ग्रामसेवक लक्ष्मण ढेपे यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...