आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालन्यातील वीज बिल घोटाळा: 'मदर' संस्थेला क्लीन चिट, दोन लेखापाल निलंबित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जालना येथे महावितरण कंपनीच्या ८१ लाख ५१ हजार ४६५ रुपयांच्या वीज बिल घोटाळा प्रकरणात बिलाची रक्कम जमा करणाऱ्या मदर महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला चौकशी अहवालात क्लीन चिट देण्यात आली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महावितरणला प्रारंभी हे नुकसान सहन करावे लागल्याचा ठपका अंतिम चौकशी अहवालात ठेवण्यात आल्याने उच्च स्तर लेखापाल आणि सहायक लेखापालाला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान ग्राहकांचे चेक बँकेत न वटल्याने हा घोळ झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून क्रेडिट दिलेल्या ग्राहकांचे ८१ लाख ५२ हजार रुपये पुन्हा महावितरण कंपनीच्या खात्यात जमा झाले आहेत. 

 

महावितरण कंपनीच्या कार्यालयात वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना तासंतास ताटकळत बसावे लागत असल्याने महावितरणने कमिशन तत्त्वावर जालना सब डिव्हिजनच्या अखत्यारीत येणाऱ्या मदर महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेला १ डिसेंबर २०१७ पासून वीज बिल जमा करण्याची परवानगी दिली होती. संस्थेने १ डिसेंबर २०१७ ते १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सुमारे ३४२ पावत्या फाडून चेक बँकेत जमा केले होते. याची किंमत ८१ लाख ५१ हजार ४६५ रुपये इतकी होती.

 

ग्राहकांकडून संस्थेत जमा केलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महावितरणच्या उच्च स्तर लेखापाल पंकज सरदेशपांडे, साहाय्यक लेखापाल मायानंद अडकिने यांना निलंबित करण्यात आले. 

 

संस्थेला क्लीन चिट, अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा 
मदर महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने ग्राहकांकडून वसूल केलेले पैसे व धनादेश महावितरणच्या खाते असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा केले होते. यात ८१ लाख ५१ हजार रुपये किमतीचे ३४२ धनादेश तारीख नसणे, रकमेत तफावत, ग्राहकांची सही नसणे, अक्षरी व सांख्यिक रकमेत फरक असणे, नॉन सीटीएस धनादेश असल्यामुळे ते बँकेत वटले नव्हते. असे असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे पैसे ग्राहकांच्या वीज बिलातून वजा झाले होते. यामुळे महावितरण कंपनीला नुकसान झाल्याचे डी. आर. बनसोडे, अे.बी. पाडसवान. एस.एम. काकडे यांनी केलेल्या अंतिम चौकशीत अहवालात समोर आले होते. या प्रकरणी उच्च स्तर लेखापाल व साहाय्यक लेखापाल यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले. पुढील चौकशी होण्यासाठी जालना कार्यालयाला दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महावितरण कंपनीचे प्रादेशिक सरव्यवस्थापक संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. 

 

प्रक्रिया सुरू आहे 
या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानंतर दस्तऐवजांची जमवाजमव सुरू असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कैलाश हुमणे, अधीक्षक अभियंता, जालना 

 

पैसे खात्यात जमा झाले 
धनादेश बँकेत वटले नव्हते अशा ग्राहकांच्या वीज बिलात ती रक्कम लावण्यात आली होती. ही रक्कम महावितरणच्या खात्यात जमा झाली. बी.एस. महापुरे, व्यवस्थापक, लेखा विभाग, जालना 

 

नाहक नाव गोवले 
बँकेत जमा धनादेशाबाबतची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती. त्यांनी त्याचे काय केले याच्याशी आमचा संबंध नव्हता. तरी नाहक आमचे नाव यात गोवले गेले. साजिया खान, संचालिका, मदर महिला संस्था, जालना