आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिरखेड- सततच्या नापिकीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. त्यातच अप्पर वर्धा धरण असलेल्या मोर्शी तालुक्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिक जगवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. अशातच शासनाने मोर्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शिरखेड परिसरात शेतकऱ्यांना अन्य पिकांसह संत्रा बागा जगविण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत असून, त्यांच्यापुढे संत्रा बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. बागा जगविण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एकीकडे संत्र्याला योग्य भाव नाही. त्यामुळे खर्च निघणेही कठीण जात आहे. त्यातच तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागांना जगवावे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. शिरखेड परिसरातील सावरखेड येथील प्रवीण बेलखेडे व बंडू बेलखेडे यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यामध्ये त्यांनी संत्र्याची बाग लावली आहे. झाडांवर आंबिया बहाराची संत्री आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या शेतात तीन बोअरवेल व दोन विहिरी आहेत. मात्र त्या सर्वांचा जलस्तर खाली गेल्याने या दोघा भावंडांना संत्रा बाग जगविणे कठीण लात आहे. बाग जगविण्यासाठी त्यांनी १० किमी अंतरावरून ट्रॅक्टर विकर आणून तो विहीरीत सोडत आहेत. ड्रीपच्या माध्यमातून झाडांना पाणी देण्यात येत आहे. मात्र विहिरीतील पाणी एकाच दिवसात संपत असल्याने पुढे काय, असा प्रश्न दर दिवशी त्यांच्या पुढे उभा राहतो. संत्रा बाग जगविण्यासाठी प्रत्येक प्रकारे प्रयत्न करूनही व्यापारी प्रति टन २५ हजार रुपये भाव देत आहेत. अशीच परिस्थिती अन्य संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची असल्याने आता करावे तरी काय, असा प्रश्न परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. एकीकडे संत्रा जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर शेतातील विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक चिंतेत सापडले आहेत.
विपणनाची व्यवस्था नसल्याने नुकसान
कृषी उत्पादन असताना बाजारपेठेत कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे व देशभरातील भाव सांगणारी व्यवस्थाच अस्तित्वात नसल्यामुळे सलग चौथ्या वर्षी शेतकऱ्यांना मातीमोल भावाने संत्रा विकण्याची वेळ आली आहे. बागायत पट्ट्यात कधीकाळी संपन्नता आणलेल्या संत्र्याने अनिश्चित बाजारपेठ व संरक्षण नसल्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणल्याची स्थिती निर्माण झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.